मंगळवार, २३ ऑक्टोबर, २०१२

माध्यमं आणि लोकं पोपटाच्या पिंजऱ्यात

http://youtu.be/gcgxqrI-CpA

एका पोपटाच्या अंगावर छताचे सिमेंट पडते आणि तो ते झाडतो. लगेच एकजण आरोळी ठोकतो अरे हा तर डॅन्ड्रफवाला पोपट. मग एका मागून एक मीडियावाले त्या पोपटाच्या शोधात तिथे येतात. आणि शेवटी कळतं की अरे हा तर डॅन्ड्रफ नसून छतावरून पडणारी पावडर आहे... ही जाहिरात टीव्हीवर जोरात सुरू आहे. खरे तर ती बिर्ला सिमेंटची जाहिरात असली तरी जाहिरात निर्मात्याने भारतीय माध्यमांची, त्याच्या परिणामाची दशा आणि दिशा दाखवणारी शॉर्ट फिल्मच केली आहे जणू. इतक्‍या अचूक पद्धतीने भारतीय टीव्ही मिडीयावर भाष्य अजूनतरी कोणी केलेले नाही. सध्याची परिस्थिती बघितली तर ही शॉर्टफिल्म शंभर टक्‍के खरी वाटते. किंबहुना ही शॉर्ट फिल्म सध्याच्या मीडिया जगताची डॉक्‍युमेंट्री बनून राहील की काय इतके साम्य त्यात आहे. भारतीय लोकांचे वर्णन करण्यासाठी मॅंगो पीपल्स इन बनाना कंट्री म्हणण्यापेक्षा माध्यमं आणि लोकं पोपटाच्या पिंजऱ्यात असंच करावं लागेल.

इंडीया अगेंस्ट करप्शनचे नेते अरविंद केजरीवाल आणि त्यांची टीम ज्या पद्धतीने बोलते आहे, त्याला इतर पक्षाचे लोक ज्या पद्धतीने उत्तर देत आहेत आणि त्यामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती या डॅन्ड्रफवाल्या पोपटापेक्षा वेगळी नाही. अरविंद केजरीवाल भ्रष्टाचाराबद्दल बोलतात. तो समूळ नष्ट करण्यासाठी आंदोलन आणि व्यवस्था बदण्याच्या गोष्टी करतात, पण त्यासाठी ते जो मार्ग अवलंबितात तो खूपच स्वस्त आहे. प्रसिद्धीचा प्रचंड हव्यास, सत्तास्थानी लवकर पोचण्याचे ध्येय आणि त्यासाठी कोणाचाही "वापर' करायला ते मागे पुढे बघत नाहीत.
भारतीय लोकशाही किती चांगली आणि किती वाईट याबाबत इथे म्हणणे मांडणे चुकीचे. व्यवस्था बदलण्याचे काम किंवा ध्येय अनेकजण ठेवून आहेत. त्यात नक्षलवादी (ज्यांना मीडिया माओवादी म्हणतो, ते त्यांच्या खच्चीकरणासाठी. माओवाद आणि नक्षलवाद या दोन भिन्न गोष्टी आहेत. त्यात साधर्म्य असले तरी वैचारिक मतभेद आहेत.) प्रमुख आहेत. रोज चार वाजले की केजरीवाल आणि टीमचे हात थरथरायला लागतात. पाय लडखडायला लागतात. समोर टिव्ही चॅनेलवाल्यांचे दंडुके नसेल तर घाम फुटायला लागतो. मग कुठले तरी प्रकरण बाहेर काढायचे, कुणाला तरी भ्रष्टाचारी नावाचा पुरस्कार द्यायचा टीव्हीवर चमकायचे, संध्याकाळच्या चर्चांमध्ये सहभागी व्हायचे असा त्यांचा दिनक्रम सुरू आहे. यातील एक बाबही चुकली तरी मग रात्री यांना झोप लागत नाही की काय असे वाटते.
केजरीवाल ज्या प्रश्‍नावर आंदोलन करताहेत तो नाकारण्यात अर्थ नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण ज्या पद्धतीने ते हे सारे करू पाहताहेत त्या पद्धतीला विरोध झालाच पाहिजे. व्यवस्था बदण्यासाठी ठोस कार्यक्रम असावा लागतो, तसा कार्यक्रम केजरीवाल यांच्याकडे नाही, ते धैर्य आणि ताकद तर नाहीच नाही. रस्त्यावर तमाशा करणाऱ्या लोकांना विचारा, त्यांच्या गळ्यातील ढोल वाजायला लागला की लोक येतात, काही काळ थांबतात, दोरीवरून पोरीने चालून दाखविले की टाळ्याही वाजवितात. पण पैशासाठी हात पुढे केले की अनेकांचे हात खिशातून बाहेरच येत नाहीत. हीच स्थिती केजरीवाल आणि त्यांच्या कंपूच्या बाबतीत आहे. ते जिथे जातात आणि तमाशा करतात तिथे बघ्यांची गर्दी होते. मग केजरीवाल आपल आपले मिचके डोळे आणखी मिचकावत काही बाही बरळतात... लोकं टाळ्या वाजवतात, आज बीन पैशाचा तमाशा बघायला मिळाला म्हणून सुखावतात आणि रात्री झोपून जातात. त्यातल्या काहींचा पुन्हा टीव्हीवर आपल्याला या माध्यमातून का होईना झळकता येईल का? असा विचार असतो. चोवीस तास न्यूज चॅनेलवाले रिपोर्टर असे अतृप्त आत्मे शोधत असतातच. त्यातील एखादा जर मिळाला तर त्यांची असाइनमेंट पूर्ण होते, आणि आत्माही संतुष्ट होतो. किसका टुडे किसका फुटे अशा अशयातूनच सगळं चाललं आहे.
केजरीवाल स्वतःला गांधीवादी म्हणवतात, त्यासाठी त्यांनी मयांक गांधी नावाचा एक गांधीही हायजॅक केला आहे. पण यांच्या टीव्ही पॅनेलच्यादृष्टीने भ्रष्टाचार, राजकारण, समाजकारण यापेक्षा टीव्हीवर चमकणं हाच उद्देश आहे की काय असे वाटते. काही महिला पॅनेलीस्ट तर डोळ्यात काजळ आणि लिपस्टीक लावून डोळे मिचकावर इंग्रजी चॅनेलवर डिबेट करताना दिसतात. ज्या प्रश्‍नासाठी आपण आंदोलन छेडतो आहे, त्याचे मूळ याबाबत त्यांची वक्‍तव्य म्हणजे आठवी-नववीमधील पोरं जशी चर्चा करतात ना तशीच असतात. "" मग काय झालं. आमची चौकशी करा. तुम्ही मूर्ख आहात. सगळे पक्ष भ्रष्टाचारी, सगळ्यांचे एकमेकांशी साटेलोटे.'' ही वक्‍तव्य बघितली की यांच्याबाबत हसावे की रडावे हेच कळत नाही. अरविंद केजरीवाल यांनी एक आरोप केला की सगळ्या पक्षाचे नेते हे आतून एकच आहेत. मग टिव्ही चॅनेलवाले नेत्यांच्या घरचे लग्नादी समारंभाचे फोटो झळकवून सांगू लागले हो सगळे नेते एकच आहेत. काय चाललंय काय? या देशात दोन वेगळ्या विचारांच्या लोकांनी खासगी कार्यक्रमांना उपस्थित राहू नये काय? दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षात असणे म्हणजे दुश्‍मनी असते काय? अरविंद केजरीवाल यांना 80 च्या दशकांतील हिंदी चित्रपटातील दोन खानदान की लढाईवाले पक्ष हवे आहेत की काय? बरे तो अरवींद नावाचा पोपट बोलला असेल काही तरी पण याला हे मीडियावाले का बधले. तो काहीही बरळला तर मग त्याच्या मागे जाणार? एकूणच भारतीय माध्यमांची अवस्था ही डॅन्ड्रफवाल्या पोपटासारखी झाली आहे हे निश्‍चित. त्यांचा डॅन्ड्रफ आता कोण धुणार हे काळच ठरवेल. 

1 टिप्पणी:

  1. बाकी काही नाही..
    ह्या मोठ्यामोठ्या चर्चा करणाऱ्या लोकांना चार दिवस उपाशी ठेवून मग चर्चा करायला सांगा ...मग पाहू ........

    उत्तर द्याहटवा