रविवार, १५ डिसेंबर, २०१३

रावलेंच्या हातात नार्वेकर बसचे तिकीट का ?



मिलींद नार्वेकर यांच्यामुळे शिवसेना डबऱ्यात जाणार नाही. जे लोक शिवसेनेला डाईजड झाले आहेत त्यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मिलींद नार्वेकर नावाची बस तयार केली आहे एवढेच म्हणता येईल. त्यांना नार्वेकर बसमध्ये घालून योग्य स्थळी सोडण्याची तयारी चालविली आहे. आता विश्‍लेषण करताना जर कोणी म्हटले की नार्वेकरांमुळे आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो तर तो त्यांचा प्रश्‍न आहे. उद्धव ठाकरेंना मात्र माहीत आहे की नार्वेकर बसचे तिकीट कोणाच्या हातात द्यायचे आणि कोणाला नाही.
..............................
प्रवीण कुलकर्णी

शिवसेनेत जे आत्ता चालले आहे आणि जे काल परवा गेले आहे त्याला एकच कारण आहे ते म्हणजे मिलींद नार्वेकर अशी टीका आता टोकदार झाली आहे. शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्यानी उघड उघड मिलींद नार्वेकरच कसे कारणीभूत आहेत हे सांगितले आहे. मिलींद नार्वेकरमुळेच शिवसेना फुटत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शिवसेनेतून फुटणाऱ्यांनी तसे म्हणणे याला काही कारणे आहेत आणि ती बरोबरही आहेत, विरोधकांनी त्याला खतपाणी घालणं हेही राजकारणाचा भाग म्हणून बरोबर म्हणता येईल. पण राजकीय विश्‍लेषकांनीही हेच खरे मानून पक्षनेतृत्वावर अविश्‍वास दाखविणे अन्यायकारक तर आहेच पण समजुतीचा घोटाळाही आहे.
राजकारणात कधीच दोन अधिक दोन चार असत नाही. त्याची उत्तरे कधी तीन येतात तर कधी 22 त्यामुळे प्रत्येक घटनेचा गणीती नियमांनी अभ्यास करून चालत नाही. शक्‍येअशक्‍यतेच्या स्थीतीचा, परिस्थीतीचा, भोवतालच्या राजकारणाचा आणि समाजकारणाचा एकूण परिणाम विचारात घ्यायला हवा आणि मग विश्‍लेषण व्हायला हवे, पण तसे होताना दिसत नाही. शिवसेनेतील मिलींद पर्वाबाबतही तसेच म्हणता येईल. माजी खासदार मोहर रावलें यांनी शिवसेना नेतृत्वावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत मिलींद नार्वेकरवर बाण सोडल्यानंतर शिवसेना नार्वेकरांमुळे तळात जाणार अशा स्वरुपाच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. राज ठाकरे, नारायण राणे यांनी शिवसेना सोडली त्यावेळीही नेतृत्वाभोवतीच्या कोंडाळ्यालाच कारण केले होते आणि आताही तेच कारण असल्याने बाळसाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेना कशी चालणार असा गहन प्रश्‍न तथाकथीत विश्‍लेषकांना पडला आहे.
मुळात लोक पक्ष का सोडतात? पक्ष सोडताना ते काय कारणे देतात? पक्षनेतृत्व अशा लोकांपुढे का झुकत नाही? अशा अनेक प्रश्‍नांचा यानिमित्ताने धांडोळा घेणे गरजेचे आहे. शिवसेना हा प्रादेशीक पक्ष असला तरी भारतातील इतर प्रादेशीक पक्षाचे जे काही फायदे असतात आणि जे तोटे आहेत ते सगळेच्या सगळे जशेच्या तसे शिवसेनेला लागू होत नाहीत. भारताच्या इतर राज्यात जे काही प्रादेशीक पक्ष आहेत ते बऱ्याचअंशी धर्मनिरपेक्षतेचा मुखवटा घालून फिरतात त्यामुळे त्यांना सत्तेचे राजकारण करण्यास प्रचंड वाव असतो. (मायावती, मुलायमसिंग, नितिशकुमार, नवीन पटनाईक, कुमारस्वामी यांनी भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रीपदाची चव चाखली आहे. ममता बॅनर्जीसारख्यांनी केंद्रीय मंत्रीपदे घेतली होती.) त्यामुळेच सत्तेचे राजकारण खेळणे सहज शक्‍य होते अर्थात त्याचेही काही तोटे असतात पण भारतीय राजकारणात जे पक्ष स्वतःला सेक्‍यूलर समजतात त्यांना सत्तेचा जुगाड करणे खूप सोपे जाते. त्यामुळे प्रमुख राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजप किंवा कॉंग्रेस यांना पाठिंबा देऊन-घेऊन सत्तेची फळे चाखता येऊ शकतात. पण प्रचंड उजव्या असलेल्या शिवसेनेसारख्या पक्षाला कॉंग्रेससोबत जाणे परवडणारे नाही आणि जमणारेही नाही. (शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अशी युती शक्‍य आहे. पण राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला राज्याबरोबर केंद्रातही सत्ता हवी असल्याने ते एक तर कॉंग्रेससोबत जातील किंवा भाजपसोबत. शिवसेनेशी युती करुन केंद्रातील सत्ता गमविण्याचा धोका राष्ट्रवादी घेत नाही तोपर्यंत तरी शिवसेनेला भाजपशिवाय पर्याय नाही.) यामुळे सत्तेशिवाय पक्ष टिकविणे, तो वाढविणे आणि त्याला सत्तेपर्यंत नेणे हे तलवारीच्या पात्यावर चालण्यासारखे आहे. सत्ता असताना पक्ष टिकविणे आणि पक्षाचे नेतृत्व करणे हे तुलनेत खूपच सोपे काम आहे. त्याशिवाय कायमच सत्तेशिवाय राहाणे हेही एका अर्थाने खूप चांगले असते आणि शिवसेनेतील धुसफुसीमागे हे एक प्रमुख कारण आहे.
1991 पुर्वी शिवसेना वाढीचा वेग प्रचंड होता याचे कारण सत्तेपर्यंत आपण पोचू याची सर्वसामान्य शिवसैनिकांना आशा होती. 1995 मध्ये शिवसेनला भाजप आणि अपक्षांच्या साथीने सत्ता मिळाली आणि तेथूनच राजकीय संघटनेचे रुपांत पक्षीय राजकारणात व्हायला सुरवात झाली. मुळात बाळासाहेबांनी तालेवार मंडळींना पक्षात घेण्यापेक्षा सर्वसामान्यांना पक्षात घेतले. त्यांना बळ दिले आणि त्यांना सत्तास्थानापर्यंत पोचू दिले. त्यामुळे शिवसेनेत तथाकथीत तालेवार मंडळी नव्हतीच. साहेब सांगतील तो आदेश आणि साहेब मानतील ती दिशा मानून सर्वसामान्य शिवसैनिक लढत राहीला. छोटी-छोटी सत्तास्थाने मिळवित गेला. शिवसेनेला पहिला धक्‍का बसला तो भूजबळ यांच्या रुपाने भूजबळांनी काही आमदारांसह बंड करुन शिवसेनेला ठोकलेला रामराम हा पक्षातील पहिला उठाव होता. त्यावेळी त्यांनी पक्षनेतृत्वावर टीका न करता मनोहर जोशींना टीकेचे लक्ष्य केले होते, आणि पक्ष सोडला होता. त्यानंतर राणे, राज ठाकरे यांनीही तोच कित्ता गिरविला. मनोहर जोशींच्याऐवजी मिलींद नार्वेकर एवढाच तो काय फरक होता. आता भूजबळांनी पक्ष सोडला त्यावेळी शिवसेना वाढत असली आणि तिचा वाढीचा वेग चांगला असला तरी नजीकच्या काळात शिवसेना सत्तेत येऊ शकते असे वाटत नव्हते. (1992-93 मध्ये बाबरी मशीद पाडली गेली आणि त्यानंतर भडकलेल्या दंगलीमुळे शिवसेनेचे आणि भाजपचे संख्याबळ वाढले ). त्यामुळे सत्तास्थानी पोचायचे असेल तर शिवसेना सोडण्याची आवश्‍यकता होती. त्यामुळे भूजबळांनी शिवसेनेला रामराम ठोकला. (मनोहर जोशींवर टीका करणाऱ्या छगन भूजबळांवर राष्ट्रवादीत गेल्यानंतर अनेकवेळा मानहाणीचा प्रसंग आला पण तरी ते राष्ट्रवादीला चिकटून राहण्यामागे सत्ता हेच एक कारण आहे.) राणेंनी शिवसेना सोडण्यामागेही हेच कारण होते. विरोधी पक्षनेते असलेल्या राणेंना युती काळात शेवटचे सहा महिने मुख्यमंत्रीपद मिळाले होते. त्यामुळे सत्तेची गोड फळे त्यांनी चाखली होती. (अर्थात त्याआधिही ते मंत्रीही होतेच) उद्या युती सत्तेवर आल्यास उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील आणि आपल्याला मुख्यमंत्रीपद कदापी मिळणार नाही हे ठावूक असल्यानेच त्यांनी कॉंग्रेसमध्ये घरोबा केला. (अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाल्यावर राणेंनी केलेली वक्‍तव्य वाचली तर ते आणखी ठळक होते.). राज ठाकरेंचे विश्‍लेषण यापेक्षा थोडे वेगळे आहे. तेही सत्तेसाठीच बाहेर पडले पण ते पक्षातील सत्तेसाठी. राणे ज्यावेळी बाहेर पडले त्यावेळी शिवसेना-भाजपला नजीकच्या काळात सत्ता मिळणार नाही याबाबत कोणाच्या मनात दुमत नव्हते. त्यामुळे राणेंना शिवसेना सोडायचीच होती. राणेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर सरळ सरळ टीका न करता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करुन शिवसेना सोडली. याच धर्तीवर मोहन रावले यांच्या पक्ष सोडण्याकडे बघितले पाहिजे. मोहन रावले बाळासाहेबांच्या खूप मर्जीतले. बाळासाहेब ठाकरेंचा मुंबईवर असलेल्या करिष्म्यावर अनेक जण नगरसेवक, आमदार, खासदार झाले. मोहन रावले हे त्यापैकीच. त्यामुळे शिवसेनेच्या दृष्टीने त्यांची किंमत एक खासदार. लोकसभेतील शिवसेनेचे आणखी एक मत एवढाच होता. निर्णय सगळे मातोश्रीवर घ्यायचे आणि त्याची अंमलबजावणी लोकसभेत यांनी करायची एवढाच कार्यवाहूपणा त्यांच्याकडे होता. शिवसेनेची सुत्रे उद्धव ठाकरे यांच्याकडे आल्यानंतर त्यात अमुलाग्र बदल होऊ लागला आहे. दललेल्या नव्या मतदारांना आपल्याकडे खेचायचे असेल तर पक्षसंघटनेत बदल करणे आवश्‍यक होते. त्यासाठी जुन्या पिढीच्या अनुभवाचा फायदा घेत निवडणुकीच्या राजकारणात दुसरी फळी उतरविणे भाग होते. त्यासाठी त्यांनी पद्धतशीरपणे काम करायला सुरवात केली आहे. त्यामुळे ज्येष्ठ फळी आणि नेतृत्व असा वाद उभा राहू लागला. आपल्याला पुढच्या लोकसभेचे तिकीट मिळणार नाही. देशात कॉंग्रेसविरोधी वातावरण असताना तिकीट मिळत नाही याचाच अर्थ येणाऱ्या सत्तेत आपला वाटा असणार नाही. आता सरळ नेतृत्वावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यापेक्षा अवतीभोवती चिखलफेक करून हातात काय लागते का हे बघण्याचा हा प्रयत्न होता. त्यातूनच मिलींद नार्वेकरांच्या नावाचा उद्धार करण्यात आला. शिवसेनेचे सगळे कामकाज नार्वेकरच करत असल्याचा भास निर्माण करण्यात आला. जयललीता काय किंवा उद्धव ठाकरे काय अशा सर्वांनाच अशा काही माणसांची गरज असते ज्यांच्यावर ते निर्णय सोपवतात. अनेकवेळा पक्षनेतृत्व आपल्याला पाहीजे तोच निर्णय घेते आणि ते सांगितले मात्र जाते अशा स्वीय सहाय्याकडून. आपला स्वीय सहाय्यक कसा आहे. त्याला संघटनेच्या बऱ्या वाईटाची कल्पना आहे का? कोणता निर्णय तो घेऊ शकतो कोणत्या निर्णयात ढवळा ढवळ करायची नाही हे नेत्यांना चांगलेच ठावूक असते. खास करुन उद्धव ठाकरेंसारखा नेतो जो मवाळ दिसतो त्या नेत्याचे आकलन चटकन होणे शक्‍यच नाही. मुंबई महापलिकेवर भगवा झेंडा फडकवतानाही उद्धव ठाकरे यांनी दाखवलेले नेतृत्व हेच सिद्ध करते की या नेता वरुन खूप मवाळ दिसत असला तरी आतून खूपच धीरगंभीर आहे. पक्षाची निवडणूक केवळ भावनेच्या लाटेवर होत नाही हे जाणून त्यांनी योग्य उमेदवार दिले आणि ते निवडूनही आणले. त्यामुळे रावलेंच्या म्हणण्यात काही अर्थ नाही. नार्वेकर ज्या दिवशी डोईजड होतील त्या दिवशी त्यांचा घाशीराम होईल हे निश्‍चित. तोपर्यंत जे वाईट घडतं आहे ते नार्वेकरांमुळे आणि जे चांगलं घडतंय ते उद्धव ठाकरेंमुळे हेच खरे. आणि हेच खरे राजकारण आहे. 

मंगळवार, २३ ऑक्टोबर, २०१२

माध्यमं आणि लोकं पोपटाच्या पिंजऱ्यात

http://youtu.be/gcgxqrI-CpA

एका पोपटाच्या अंगावर छताचे सिमेंट पडते आणि तो ते झाडतो. लगेच एकजण आरोळी ठोकतो अरे हा तर डॅन्ड्रफवाला पोपट. मग एका मागून एक मीडियावाले त्या पोपटाच्या शोधात तिथे येतात. आणि शेवटी कळतं की अरे हा तर डॅन्ड्रफ नसून छतावरून पडणारी पावडर आहे... ही जाहिरात टीव्हीवर जोरात सुरू आहे. खरे तर ती बिर्ला सिमेंटची जाहिरात असली तरी जाहिरात निर्मात्याने भारतीय माध्यमांची, त्याच्या परिणामाची दशा आणि दिशा दाखवणारी शॉर्ट फिल्मच केली आहे जणू. इतक्‍या अचूक पद्धतीने भारतीय टीव्ही मिडीयावर भाष्य अजूनतरी कोणी केलेले नाही. सध्याची परिस्थिती बघितली तर ही शॉर्टफिल्म शंभर टक्‍के खरी वाटते. किंबहुना ही शॉर्ट फिल्म सध्याच्या मीडिया जगताची डॉक्‍युमेंट्री बनून राहील की काय इतके साम्य त्यात आहे. भारतीय लोकांचे वर्णन करण्यासाठी मॅंगो पीपल्स इन बनाना कंट्री म्हणण्यापेक्षा माध्यमं आणि लोकं पोपटाच्या पिंजऱ्यात असंच करावं लागेल.

इंडीया अगेंस्ट करप्शनचे नेते अरविंद केजरीवाल आणि त्यांची टीम ज्या पद्धतीने बोलते आहे, त्याला इतर पक्षाचे लोक ज्या पद्धतीने उत्तर देत आहेत आणि त्यामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती या डॅन्ड्रफवाल्या पोपटापेक्षा वेगळी नाही. अरविंद केजरीवाल भ्रष्टाचाराबद्दल बोलतात. तो समूळ नष्ट करण्यासाठी आंदोलन आणि व्यवस्था बदण्याच्या गोष्टी करतात, पण त्यासाठी ते जो मार्ग अवलंबितात तो खूपच स्वस्त आहे. प्रसिद्धीचा प्रचंड हव्यास, सत्तास्थानी लवकर पोचण्याचे ध्येय आणि त्यासाठी कोणाचाही "वापर' करायला ते मागे पुढे बघत नाहीत.
भारतीय लोकशाही किती चांगली आणि किती वाईट याबाबत इथे म्हणणे मांडणे चुकीचे. व्यवस्था बदलण्याचे काम किंवा ध्येय अनेकजण ठेवून आहेत. त्यात नक्षलवादी (ज्यांना मीडिया माओवादी म्हणतो, ते त्यांच्या खच्चीकरणासाठी. माओवाद आणि नक्षलवाद या दोन भिन्न गोष्टी आहेत. त्यात साधर्म्य असले तरी वैचारिक मतभेद आहेत.) प्रमुख आहेत. रोज चार वाजले की केजरीवाल आणि टीमचे हात थरथरायला लागतात. पाय लडखडायला लागतात. समोर टिव्ही चॅनेलवाल्यांचे दंडुके नसेल तर घाम फुटायला लागतो. मग कुठले तरी प्रकरण बाहेर काढायचे, कुणाला तरी भ्रष्टाचारी नावाचा पुरस्कार द्यायचा टीव्हीवर चमकायचे, संध्याकाळच्या चर्चांमध्ये सहभागी व्हायचे असा त्यांचा दिनक्रम सुरू आहे. यातील एक बाबही चुकली तरी मग रात्री यांना झोप लागत नाही की काय असे वाटते.
केजरीवाल ज्या प्रश्‍नावर आंदोलन करताहेत तो नाकारण्यात अर्थ नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण ज्या पद्धतीने ते हे सारे करू पाहताहेत त्या पद्धतीला विरोध झालाच पाहिजे. व्यवस्था बदण्यासाठी ठोस कार्यक्रम असावा लागतो, तसा कार्यक्रम केजरीवाल यांच्याकडे नाही, ते धैर्य आणि ताकद तर नाहीच नाही. रस्त्यावर तमाशा करणाऱ्या लोकांना विचारा, त्यांच्या गळ्यातील ढोल वाजायला लागला की लोक येतात, काही काळ थांबतात, दोरीवरून पोरीने चालून दाखविले की टाळ्याही वाजवितात. पण पैशासाठी हात पुढे केले की अनेकांचे हात खिशातून बाहेरच येत नाहीत. हीच स्थिती केजरीवाल आणि त्यांच्या कंपूच्या बाबतीत आहे. ते जिथे जातात आणि तमाशा करतात तिथे बघ्यांची गर्दी होते. मग केजरीवाल आपल आपले मिचके डोळे आणखी मिचकावत काही बाही बरळतात... लोकं टाळ्या वाजवतात, आज बीन पैशाचा तमाशा बघायला मिळाला म्हणून सुखावतात आणि रात्री झोपून जातात. त्यातल्या काहींचा पुन्हा टीव्हीवर आपल्याला या माध्यमातून का होईना झळकता येईल का? असा विचार असतो. चोवीस तास न्यूज चॅनेलवाले रिपोर्टर असे अतृप्त आत्मे शोधत असतातच. त्यातील एखादा जर मिळाला तर त्यांची असाइनमेंट पूर्ण होते, आणि आत्माही संतुष्ट होतो. किसका टुडे किसका फुटे अशा अशयातूनच सगळं चाललं आहे.
केजरीवाल स्वतःला गांधीवादी म्हणवतात, त्यासाठी त्यांनी मयांक गांधी नावाचा एक गांधीही हायजॅक केला आहे. पण यांच्या टीव्ही पॅनेलच्यादृष्टीने भ्रष्टाचार, राजकारण, समाजकारण यापेक्षा टीव्हीवर चमकणं हाच उद्देश आहे की काय असे वाटते. काही महिला पॅनेलीस्ट तर डोळ्यात काजळ आणि लिपस्टीक लावून डोळे मिचकावर इंग्रजी चॅनेलवर डिबेट करताना दिसतात. ज्या प्रश्‍नासाठी आपण आंदोलन छेडतो आहे, त्याचे मूळ याबाबत त्यांची वक्‍तव्य म्हणजे आठवी-नववीमधील पोरं जशी चर्चा करतात ना तशीच असतात. "" मग काय झालं. आमची चौकशी करा. तुम्ही मूर्ख आहात. सगळे पक्ष भ्रष्टाचारी, सगळ्यांचे एकमेकांशी साटेलोटे.'' ही वक्‍तव्य बघितली की यांच्याबाबत हसावे की रडावे हेच कळत नाही. अरविंद केजरीवाल यांनी एक आरोप केला की सगळ्या पक्षाचे नेते हे आतून एकच आहेत. मग टिव्ही चॅनेलवाले नेत्यांच्या घरचे लग्नादी समारंभाचे फोटो झळकवून सांगू लागले हो सगळे नेते एकच आहेत. काय चाललंय काय? या देशात दोन वेगळ्या विचारांच्या लोकांनी खासगी कार्यक्रमांना उपस्थित राहू नये काय? दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षात असणे म्हणजे दुश्‍मनी असते काय? अरविंद केजरीवाल यांना 80 च्या दशकांतील हिंदी चित्रपटातील दोन खानदान की लढाईवाले पक्ष हवे आहेत की काय? बरे तो अरवींद नावाचा पोपट बोलला असेल काही तरी पण याला हे मीडियावाले का बधले. तो काहीही बरळला तर मग त्याच्या मागे जाणार? एकूणच भारतीय माध्यमांची अवस्था ही डॅन्ड्रफवाल्या पोपटासारखी झाली आहे हे निश्‍चित. त्यांचा डॅन्ड्रफ आता कोण धुणार हे काळच ठरवेल. 

रविवार, ७ ऑक्टोबर, २०१२

देव, देवत्व आणि दैववाद


देव, देवत्व आणि दैववाद या गोष्टी खूपच सापेक्ष आहेत. भक्‍ताला भेटणारा देव साधूला भेटत नाही आणि साधूला भेटणारा देव तर्कशास्त्रज्ञाला भेटणार नाही. सर्वसामान्य आणि धार्मिक माणसाला दगडातही देव दिसतो तसा ज्ञानी माणूसही चराचरांत देव मानतो. वेदनांचा डोंगर उचलणारा सर्वसामान्य माणूस देवाचे अस्तित्वच नाकारतो अगदी तसाच एखादा बुद्धिजीवी देवाला रिटायर करा म्हणतो, हेच आपले समाजमन आहे. पण यातही एक मेख आहे, देव आणि देवत्व आणि दैववाद या वेगवेगळ्या गोष्टींची सरमिसळ झाली आहे. एखाद्याने एखाद्या साधूला देव मानले नाही तर तो काही नास्तिक होत नाही. किंवा साधू संतांनाच देव करून त्यांची पूजा केल्याने एखादा अंधश्रद्धाळू ठरत नाही. अद्वैत हे सनातन धर्माचे मूळ आहे, त्यामुळे कोणी स्वतःला देव मानत असेल तर त्याला ते मानू द्यावे, त्याने लोकांनीही आपल्याला देव मानले पाहिजे हा अट्‌टहास धरता कामा नये. देव, देवांचे अवतार आणि देवत्व यांबाबत चिकित्सा येथे केली आहे. ती करताना नकारात्मक दृष्टिकोन बाळगलेला नाही, जे आहे, जसे आहे आणि जे जाणवते आहे ते मांडले आहे.....
शेवटी आपली सहा शास्त्रे म्हणजे तरी काय? "कर्ज काढून तूप प्या, मजा करा...' म्हणणारा चार्वाक आणि "सगळं जग ब्रह्ममय' म्हणणारा अद्वैतवाद. ही सगळी मतं एकाच समाजाची. त्यामुळे त्यातल्या एकालाच खरं म्हणता येणार नाही किंवा खोटंही. म्हणूनच ज्ञानेश्‍वर माऊली या सगळ्या शास्त्रांना गणेशाच्या शस्त्रांची उपमा देतात. कारण, तारतम्याने म्हणजे योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य तऱ्हेने या शस्त्रांचा वापर करणारी त्याची बुद्धी सर्वश्रेष्ठ आहे!


1. दशावतार आणि त्या पाठिमागची कारणे...



विष्णूच्या दशावतारांची कथा सगळ्यांनाच माहिती आहे. मत्स्यावतारापासून ते कलकी अवतारापर्यंत. प्रत्येक अवतारामागे काही तरी सांगणे आहे. मानवी मुल्यांना अधिष्ठान देणे आहे. देव आहे किंवा नाही या वादापेक्षा प्रत्येक प्राण्यात-पक्ष्यांत देव आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न तत्कालीन ऋषींनी केला आहे. नंतरच्या काळात यांकडे कर्मकांड म्हणून बघितले ते कीर्तनकारांनी.
असो.
देव आणि देवत्व या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ऋषींनी प्रत्येक गोष्टीत देवत्व बघायला सांगितले. दैव तत्त्व म्हणजे ज्यातून निर्मिती होते, जिचे पालन आवश्‍यक आहे आणि ज्याचा लय होत नाही. विष्णूचे सगळे अवतार याच दैव तत्त्वातून निर्माण झाले आहेत. कदाचित त्या-त्या परिस्थितीत त्यांना देवत्व आले नसेलही. नव्हतेच. पण नंतर त्यांना देवत्व प्राप्त झाले ते समाजाच्या उन्नतीसाठी, समाजाच्या धारणा बदलण्यासाठी. त्यामुळे देवाला का जन्म घ्यावा लागला वगैरे प्रश्‍नांना अर्थ उरत नाही. लोकभावनेनुसार शिक्षण देणे आणि त्यातून चांगुलपणा विकसित करणे यालाच धर्म म्हटले, तर हे काम धर्माचे होते हे निश्‍चित. मुळात आपल्या सर्व पुराण कथा या विशेषणांवर आधारित आणि काव्यात्मक आहेत. त्यामुळे त्याचा अर्थ लावताना मूळ शब्दांपेक्षा भावनेला जास्त महत्व देणे गरजेचे आहे. शब्द प्रमाण मानून त्यानुसार अर्थ काढला तर चुकीचाच निघण्याचा संभव अधिक आहे. त्याचबरोबर तो कोणत्या काळात वापरला, त्यावेळी त्याचा नेमका अर्थ काय होता, कालानुरूप त्यात काही बदल झाला का हेही तपासणे गरजेचे ठरते. तसे न केल्यास त्याचा अनर्थ लागणार हे निश्‍चित.
विष्णूच्या दशावतरांचा उल्लेखही याच प्रमाणे करायला हवा.

दशावतारांचा अनुक्रम आणि डार्विनचा उत्क्रांतिवाद यांच्यात साम्य आहे. याचा अर्थ लगेच आपणच श्रेष्ठ आणि पाश्‍चिमात्य लोक आपले ज्ञान चोरणारे असा होत नाही. याचा अर्थ आपल्या ऋषींनाही याबद्दल अभ्यासांती काही गोष्टी कळल्या असणार आणि त्याकाळानुसार त्या त्यांनी त्यावेळच्या भाषेत मांडल्या असणार. हे एकप्रकारचे सैद्धांतिक लेखन होते. ज्यावर नंतर प्रयोग करून खात्री करणे गरजेचे होते. पण ते तसे न झाल्याने सिद्धांत आहे तिथेच राहिले एवढेच.
जीवसृष्टी प्रथम पाण्यात निर्माण झाली असावी असा अंदाज वैज्ञानिकांनी वर्तवला आहे. विष्णूचा पहिला मत्स्यावतारसुद्धा जलचर आहे. त्यानंतरचा दुसरा कूर्मावतार हा पाण्यामधून निघून सरपटत जमिनीवर येणाऱ्या कासवाचा आहे. त्यानंतर वराह हा अरण्यात राहणारा पशू आहे आणि नरसिंह हा अर्धा पशू आणि अर्धा मानव अशी मधली अवस्था आहे. वामनावतारापासून मानवाच्या विकासाला सुरवात झाली. त्यामधील पहिला वामन हा एक लघुमानव अर्थात पूर्ण विकसित न झालेला मानवच आहे. त्यानंतर परशुराम हा योद्धा आहे पण तो परशूसारखे साधे आयुध धारण करतो. अश्‍मयुगातील लोकांप्रमाणेच याचे वर्णन आहे. उत्क्रांतीतील एक एक कडी सोडवत विष्णूचे अवतार घडत आले आहेत. दाशरथी रामाकडे अनेक अस्त्रे आहेत. तो केवळ परशुवर अवलंबून नाही.
गंम्मत बघा. परशुरामाची आणि रामाची दृष्टादृष्ट होताच परशुराम हिमालयात निघून गेल्याचा उल्लेख आहे. याचाच अर्थ नवीन समाज घडू लागल्याचे ते एक प्रतीक होते. राम नितीमत्तेने राहणारा आहे. पण आयुष्य म्हणजे केवळ दोन अधिक दोन बरोबर चार एवढेच नाही तर त्यापेक्षा ते आणखी समृद्ध आहे हे शिकविण्यासाठी कृष्णावतार आहे. यात कला आणि लिलांचा समावेश आहे. कृष्णावतार जगायला शिकविताना आपले हेतू, ध्येय यांपासून विचलित होऊ नये याचीही काळजी घेतो. बुद्धावतारात बुद्धीच्या सामर्थ्याचा जास्त ऊहापोह केलेला आहे. आतापर्यंत बाहुबळ हेच सर्वश्रेष्ठ मानले जात होते त्याला छेद देण्याचा  तो प्रयत्न होता. कलकी अवताराबाबत काहीच सांगू शकत नाही.

अर्थात, यांतील प्रत्येक अवताराचे कार्य समजावून घेतले तर आताच्या समाजमनाशी त्याची नाळ जुळवता येते. किंबहुना ती तशी जुळवायला हवीच.

उदाहरणार्थ, आता वामनावताराचा विचार केला तर वामनाने बळीला पाताळात धाडले असे आपण एकीकडे म्हणतो आणि दुसरीकडे इडा-पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो हेही म्हणतो. दोन्ही गोष्टी जर बरोबर असतील तर त्याचा अर्थ समजावून घेणे गरजेचे आहे.
बळी हा चांगला राजा असणार किंवा होता यात शंका नाही. तो प्रजाहितदक्ष होता. प्रजेलासुद्धा त्याची जाणीव असते. पण राज्यविस्तारात तो आपल्या राज्यावर लक्ष ठेवू शकत नाही. परिणामी त्याचा प्रजेबरोबर संपर्क राहत नाही. त्याचे कारभारी हे राज्य बघत असतात. राजा राज्य विस्तारात मग्न असताना प्रजेवर हे कारभारी अन्याय करत असतात. त्यामुळे बळीबद्दल लोकांत नाराजी निर्माण होते. लोकभावना म्हणजेच बटूच्या रूपात येणारी क्रांती. वामन बटूने मागितलेली तीन पाय जमीन बळी देतो त्यावेळी पहिल्या पावलांत तो लोकांच्या मनातील असंतोष जागृत करतो आणि बळीचे राज्य उलथवून टाकतो. दुसऱ्या पावलाला त्याने स्वर्गाचे जे राज्य मिळविलेले असते तेथील प्रजा त्याविरोधातच असल्याने ते राज्य उलथते, आता बळीला लपण्यासाठी जागाच नसल्याने तो पाताळात जातो. याचाच अर्थ तो तिसरे पाऊल बळीच्याच डोक्‍यावर ठेवतो. लहान मनुष्यही आपल्या अमोघ शक्‍तीने राज्य उलथवू शकतो हे आपल्या पुराणकर्त्यांना सांगायचे होते. इथे प्रत्येकवेळी दुष्ट आणि सुष्ट असा उल्लेख केलेला नाही.
बळीला रंगवताना पुराणकर्त्यांनी राजा म्हणून त्याची योग्यता मान्यच केली आहे. पण योग्यता म्हणजे कारभार नव्हे, हेही त्यांनी सांगितले आहे. कितीही योग्य राजा असला तरी त्याचा कारभार प्रजेप्रती योग्यच असला पाहिजे, हा त्यामागचा हेतू होता. ही क्रांती अस्त्र-शस्त्रविरहीत होती. परंतु प्रत्येक क्रांती अस्त्र-शस्त्र विरहीत असेलच असे नाही. हे सांगण्यासाठी जर गरज वाटली तर राजाविरुद्द शस्त्र हातात घेणे गरजेचे आहे हे सांगण्यासाठी परशुरामावताराची निर्मिती झाली.

परशुराम हा प्रजेचा प्रतिनिधी वाटतो. अन्यायी राजवटीविरुद्ध लढताना त्याला शस्त्रं हाती घ्यावी वाटली. त्यासाठी तो लढत राहातो. कोणत्याही राज्याचा राजा अथवा सेनापती परशुरामला दाखविलेले नाही. तो ऋषीपुत्र आहे आणि तो वनात राहातो तरी तो लढणारा योद्धा आहे. परशुराम हा सशस्त्र लढ्याचा अध्वर्यू मानायला हवा. त्याची लढाई दीर्घ आहे.

दाशरथी रामाच्या काळात नवीन संकटे आणि त्याना सामोरे जाण्याच्या पद्धती या दोन महत्त्वाच्या गोष्टी आपल्या पुराणकर्त्यांनी सांगितल्या आहेत. मुळात रामायणाचा विचार करताना तो अनेक अंगांनी करायला हवा. त्यातील राम-रावण युद्ध, रामराज्य या दोन गोष्टींचा विचार केला तरी अनेक प्रश्‍नांची उत्तरे मिळतात. रामाच्या नितिमत्तेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणारे तीन-चार प्रसंग रामायणात आढळत असले तरी काव्याचा अर्थ लावताना शब्दांच्या मोहापासून वाचलेच पाहिजे. पहिल्यांदा आपल्या शेजारील राज्यात आपल्याला अनुकूल राजा राज्य करीत असणे हे प्रजेच्या हिताचे आहे, हे रामाने ओळखले होते, त्याचबरोबर युद्ध करताना ते आपल्या राज्यात न करता ते दुसऱ्याच्या जमीनीवर करणे गरजेचे आहे हेही वाल्मिकींनी सांगितले. त्यासाठी इतर राजांची मदत कशी घ्यायची, याचाही वस्तुपाठ मांडला आहे. चरित्रनायक राम हा एक आदर्श तत्त्वनिष्ठ महामानव आहे. त्याच्या वागण्यामधील प्रत्येक कृती जगापुढे आदर्श वर्तनाचे उदाहरण झाले आहे. राम-रावणयुद्धामधील रामाचा विजय म्हणजे सत्प्रवृत्तींचा दुष्ट प्रवृत्तीवर विजय असे दाखवले आहे.

त्र केवळ नितिनियम म्हणजेच देवत्व नव्हे हे सांगण्यासाठी कृष्णाला दशावताराचा भाग बनविले आहे. कृष्ण हा उपभोग आणि योग यांचे उत्तम मिश्रण आहे. उपभोग वाईट नाही हे सांगण्यासाठीच जणू कृष्णावताराचा जन्म झाला आहे. तो बालगुराखीही आहे आणि कंसाला मारणारा सामाजिक प्रतिनिधीही आहे. तो सुरांना आळवणारा संगीतकारही आहे आणि रुक्‍मीणीला हरणारा प्रेमवीरही आहे. तो जगाला तत्वज्ञान सांगणारा योगीही आहे आणि गोकुळात रासलिला करणारा नटखट कन्हय्याही आहे. एकूणच त्याची प्रकृती मानवी इच्छा-आकांक्षांना हवा देणारी आहे. तो सर्वात आहे आणि सर्वांतून निराळा आहे. कोणतीही एक गोष्ट तो प्रमाण मानत नाही. तो रामासारखा सत्यवचनी नाही. तो प्रसंगी खोटे बोलतो. तो रामासारखा क्षत्रिय कुलात वगैरे नाही जन्माला येत. तो गवळ्याच्या घरात वाढतो, तरी तो आपल्या कर्तृत्वाने आणि यशाने कुळाचे नाव मोठे करतो. महाभारतात कर्ण आणि कृष्ण दोघेही तुलनेत निम्न कुळातील. पण कृष्णाचा कुळामुळे कधी उद्धार झाला नाही. अगदी शेवटी शिशुपालाने केलेला उल्लेख सोडला तर.
एकूण, कुळ आणि कर्तृत्व याचा काही संबंध नाही हे ऋषींनाही सांगायचे होते.
मनावर राज्य करायचे असेल तर शस्त्रांचा धाक उपयोगी नाही हे नवव्या अवताराने सांगितले आहे. राम राजा होता, कृष्णही राजा होता. दोघांनीही धर्मस्थापनेसाठी युद्धाचा उपयोग करून घेतला. अहिंसा हे तत्व तसे उच्च असले तरी या दोन्हीही किंवा यापुर्वीच्या कुठल्याच अवतारात ते मान्य केलेले नाही. शस्त्राला शस्त्राने उत्तर हेच मान्य केले आहे. रामाने रावणाला युद्ध न करण्यासंदर्भात खलीता पाठविला होता, तसाच कृष्णानेही शिष्टाई केली होती. पण त्यापुर्वी बालीवध आणि शिशुपाल वधात राम-कृष्णांनी हा प्रयोग केलेला नाही. त्यामुळे युद्ध नाकारण्यामागे अहिंसा हे तत्व नसून तो एक राजकारणाचा भाग होता, हे म्हणायला वाव आहे. पण नवव्या अवतारात मात्र यात यु टर्न घेतला आहे. समाजाला हवा असलेला आणि पटलेला विचार देणाऱ्यास अवतार किंवा देव मानण्यात येत होते हे यांमुळे आणखी स्पष्ट होते.
नवव्या अवतारातील गौतम बुद्ध आधी सिद्धार्थ नांवाचा राजकुमार असतो. पण समाजातील दुःखे पाहून त्याला इतका कळवळा येतो की हातात येऊ घातलेल्या राजसत्तेला दूर लोटून तो वनात निघून जातो. बोधिवृक्षाखाली विचारमग्न असताना त्याला तत्त्वबोध होतो आणि पुढील सर्व आयुष्य तो समाजासाठी घालवतो. " इच्छा दुःखाचा स्रोत' हे सांगून खरा सुखाचा मार्ग आपल्या मनावर ताबा ठेवण्यात आहे, हे सत्य अधोरेखित करतो. शारीरिक सुखापेक्षा मानसिक शांती उच्च दर्जाची आहे, असे मानणारा मतप्रवाह या अवतारात दिसतो. विठ्ठल हा नववा अवतार आहे असा पर्याय लक्षात घेतल्यास तो सुद्धा निःशस्त्र आहे. त्याने कोणा राक्षसाचे दमन केल्याची कथा नाही. याचाच अर्थ या दोन्हीमध्ये एक साम्य आढळते ते म्हणजे, केवळ शस्त्राच्या जीवावरच राज्य नाही करता येत.

त्याच्या भक्तगणांनी अवघ्या महाराष्ट्राला त्याच्या भक्तीमधून उन्नतीचा मार्ग दाखवला आहे.
दहावा अवतार कलकी. तो अजून जन्माला यायचा आहे.
एकूणच दशावताराचा विचार शास्त्रीय झाला तर त्याचा परिणाम जास्त चांगला होण्याची शक्‍यता जास्त!
................................................................................................................

2. गणपती


गणपतीच्या जन्माची कथा सर्वांना माहित आहे..
पार्वती एकदा स्नानासाठी जाते. त्यावेळी स्नानगृहात कोणी येऊ नये यासाठी ती आपल्या अंगावरील तेजाने (अनेकदा याचा उल्लेख "मळ' असा केला जातो) एक मुलगा तयार करते आणि तो द्वारपाल म्हणून नेमते. काही काळानंतर महादेव येतात आणि ते आत जाऊ पाहतात. त्यावेळी हा पार्वतीपुत्र त्यांना विरोध करतो. त्याला समजाविण्यासाठी गेलेले नंदी, भृंगी, शृंगी सारे लढाईत हरतात आणि त्यानंतर स्वतः महादेव त्याचा शिरच्छेद करतात. दरम्यान स्नान आटोपून आलेल्या पार्वतीला शंकराने केलेल्या या कृत्याचा राग येतो आणि ती त्याला जिवंत करण्याची मागणी करते. ब्रह्मदेवापासून ते विष्णुपर्यंत सगळे देव कैलासावर अवतरतात. पार्वतीपुत्राला जिवंत करण्यासाठी मग सगळे एका मस्तकाचा शोध घेतात त्याचवेळी पहिला प्राणी हत्ती सापडतो आणि त्याचे
मस्तक तोडून ते त्या पुत्राला जोडले जाते. अशा आशयाची कथा कीर्तनकार आणि पुराणकार सांगतात. ही कथा देवांची असल्याने "का?' "असे कसे?' हे प्रश्‍न विचारायचे नाहीत, असेही दटावून सांगतात.
आपले संशोधक आणि विचारवंत ही कथा मान्य करत नाहीत, याची अनेक कारणे आहेत.
0 सर्वप्रथम देवी पार्वतीला कैलास पर्वतावर कोणी येईल असे का वाटले?..
0 पार्वतीला तेजापासून अख्खा पुत्र तयार करता येत होता तर मग मस्तक तोडल्यानंतर तिने केवळ मस्तक बनवून वा आहे तेच जोडून त्यात का प्राण फुंकला नाही?..
0 महादेव जर भोळा सांब असेल तर तो इतक्‍या क्षुल्लक कारणांनी का चिडला आणि त्याने त्याचा वध का केला?..
0 हत्तीचे मस्तक लावल्यानंतर तो लंबोदर कसा झाला?...
असे अनेक प्रश्‍न विचारल्यानंतर गणपती अर्थात गणेशाचे दैवीकरण कसे झाले याचा संशोधकांनी शोध घेतला.
गणपतीचा प्रथम उल्लेख ऋग्वेदात मिळतो.
दोन ऋक मंत्र (गणानाम गणपतीम्‌ हवामहे... व विषु सीदा गणपते... ) वैदिक गणपतीचा स्पष्टपणे निर्देश करतात. जरी हा वैदिक गणपती व सध्या पूजिला जाणारा पौराणिक गणपती एक नसला तरी वेदोत्तर काळात ऋग्वेदातील गणपती-ब्रह्मणस्पती-वाचस्पतीपासूनच पौराणिक गजवदन-गणेश-विघ्नेश्वर हे रूप उद्भवल्याचे अनेक संशोधक मान्य करतात.
ऋग्वैदिक गणपतीची बृहस्पती, वाचस्पती अशी नावे आहेत. या देवतेचा वर्ण लालसर सोनेरी होता. अंकुश, कुऱ्हाड ही या देवतेची अस्रे होती. या देवतेच्या आशिर्वादाविना कोणतेही इष्टकाम संभव होणार नाही, असे मानले जाई. ही देवता कायम गण नामक एका नृत्यकारी दलासोबत विराजमान असे व देवतांची रक्षकही मानली जाई.
दुसऱ्या मतानुसार भारतातील अनार्यांच्या हस्तिदेवता व लम्बोदर यक्षाच्या एकत्रिकरणातून गणेश संकल्पना निर्मिली गेली. आर्य आणि अनार्य यांच्या संगमातून अनेक देव आर्यांनी स्वीकारले. जसे मसोबा, मरीआई, तसेच गणपतीचे झाले असण्याची शक्‍यता या संशोधकांना वाटते. त्यातून गणेश हा अनार्यांचा देव आर्यांनी स्वीकारला.
आर्यांनी गणपतीचा स्वीकार करण्यामागे प्रमुख कारण, गणपतीची शरीररचना. गणपतीची शरीररचना अगदी शास्त्रीय करण्यात आली. अनार्य जरी गणपतीला विघ्नकर्ता म्हणत असले तरी आर्य त्याला विघ्नहर्ता असेच संबोधतात. त्या पुढे जाऊन ते गणपतीला बुद्धीदेवता मानतात. गणपतीला बुद्धीदेवता मानण्यामागची प्रमुख कारणे त्याच्या शरीररचनेत आहेत. त्याची शरीररचना तपासली असता अनेक शास्त्रीय आधार सापडतात. भारतीय पुराणात कोणतीही देवता अथवा परंपरा शास्त्राच्या कसोटीशिवाय स्वीकारलेली नाही. यांत गणेशाचाही समावेश होतो.
गणेशाचे ढोबळ रुप जरी बघितले आणि त्याची विशेषणे बघितली की आपल्याला त्याचा प्रत्यय येतो.
गणेशाचे मुख हे गजमुख आहे. हत्तीला सर्वात बुद्धीमान प्राणी म्हणून मानले गेलेले आहे. गणेशाकडे तुम्ही विज्ञानाच्या दृष्टीने बघितले तर त्याच्या पंचेंद्रीयांचा खूप विकास झाला आहे. नाक, कान, त्वचा, डोळे आणि जीभ. आता त्यातील जीभ हा भाग सकृतदर्शनी व्यवस्थीत दिसत नसल्याने गणेशाने कमरेला सर्प गुंडाळला आहे. म्हणजेच त्याच्या पंचेंद्रीयांचा विकास जबरदस्त झाला आहे. आपल्या पंचेंद्रीयांचा विकास जर केला तर आपल्याला ज्ञानप्राप्ती होते हे यांतून स्पष्ट करण्यात आले आहे. म्हणूनच त्याला बुद्धीदेवता, सर्व कलांत निपूण मानले गेले आहे. पंचेंद्रीयांचा जर विकास झाला तर कोणत्याही विघ्नातून आपण सहज बाहेर पडतो, यांमुळेच  त्याला विघ्नहर्ताही म्हटले आहे.
...............................................................................................................


3. हनुमान


वाल्मिकी रामायाणातील सगळ्यात कुतुहालाचे पात्र म्हणजे हनुमान. हनुमानाशिवाय रामायण अपूर्ण आहे. रामायणातील राम हा विष्णुच्या दशावतारापैकी सातवा आवतार मानला गेला आहे तर हनुमान हा शंकराच्या अकराव्या रुद्राचा अवतार मानला गेला आहे. हनुमान हा कपीमुखी म्हणजेच वानरमुखी आहे, तो रामभक्‍त आहे आणि सर्वात महत्त्वाचे तो प्रचंड शक्‍तीशाली आणि बुद्धीवान आहे. लंका दहन करणारा हनुमान, सिंधुपार करणारा हनुमान आणि द्रोणागिरी पर्वत उचलून आणणारा हनुमान अशा मिथककथांमधुन हनुमान समोर येतो. हनुमानाला किंवा कोणालाही देव मानने हे आपल्या संस्कृतीचाच एक भाग आहे. प्रत्येक प्राणिमात्रात आणि पशुपक्ष्यांत आपण देवाला शोधतो, त्यामुळे हनुमानाला देव मानण्यात गैर काहीच नाही. किंबहुना आपण शक्‍ती, बुद्धी आणि चातुर्याचीच जणू पूजा करतो. त्या अर्थाने हनुमान पूजनीय आहे यात शंका नाही. तरीही काही प्रश्‍न उरतातच. त्याना शास्त्रीय आधार घेतला तर हनुमानाचे दैवत्व कमी होत नाही, उलट ते बुद्धीच्या कसोटीवर पुरेपूर उतरते.
हनुमानाचा किंवा रामायणातील प्रत्येक पात्राचा अभ्यास करताना पहिली आणि महत्त्वाची गोष्ट नेहमी लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे वाल्मिकींनी रामायण अगोदर लिहिले आणि त्यानंतर रामायण घडले. जे जे वाल्मिकींनी लिहिले ते ते तसेच घडले असे मानले जाते. त्यामुळे यामध्ये एक संधी आहे की वाल्मिकींनी लिहिलेल्या काव्यामध्ये नंतर अनेक पात्रांना समाविष्ट करुन त्याची तुलना लिखित रामायणाशी केली जाण्याची शक्‍यता अधिक आहे. अतिशयोक्‍ती आणि रंजन ही काव्याची अंगे आहेत. रामायणही काव्य असल्याने त्यात काव्याच्या अंगाने असलेले नाट्य आहे. त्यातील शब्दांचा आणि उपमांचा अर्थ आहे तसा न लावता तो काव्य म्हणूनच बघून वास्तविकता म्हणून बघितला पाहिजे. आणि रामायणोत्तर काळात तोच अर्थ अपेक्षीत धरुन त्यावेळच्या घडलेल्या घटनांचा संदर्भ लिखित रामायणाशी लावला गेला असावा ही शक्‍यता सर्वाधिक आहे.
आता आपण केवळ हनुमानाविषयी बोलू..
हनुमान, ज्याचे नाव मारुतीही आहे, त्याचे नाव "हनुमान' पडण्यामागे एक कथा सांगितली जाते. बाळ (काही कथांमध्ये तो जन्माला आल्या आल्या त्याला सूर्य हा सफरचंदासारखा वाटला. पण हे काही तर्काला धरुन नाही. जन्माला आल्या आल्या त्याला जर सफरचंदाचे ज्ञान असते, तर सूर्य आणि सफरचंद यांतील फरकही माहित असता. त्यामुळे खाणे-पिणे माहिती झाल्यानंतरच्या काळातील हा प्रसंग असावा, पण तोही चमत्कारीक नाहीच.) मारुतीला सूर्य म्हणजे सफरचंद वाटले आणि ते खाण्यासाठी त्याने उड्‌डाण केले. पृथ्वी आणि संपूर्ण जगच संकटात सापडल्याच्या भावनेतून इंद्राने त्याच्यावर वज्रप्रहार केला आणि तो प्रहार त्याच्या हनुवटीला लागला. तो प्रहार हनुवटीला लागल्याने त्याची हनुवट सुजली, दुखावली तो मूर्च्छीत झाला. वायूने आपला वेग थांबवला आणि चिंतीत झालेल्या ब्रह्मादी देवांनी मारुतीला अनेक वरदाने दिली आणि त्याचे नाव हनुमान म्हणून प्रसिद्ध झाले.
आता यातील हनुमान हा शब्द कसा आला याबाबतीतील ही घटना योग्य मानली तरी ती आहे तशी घेता येणार नाही. तरीही एक एक गोष्ट तपासली तर त्याचा एकमेकांशी कसा गुंता झाला आहे हे लक्षात येईल.
हनुमान हा वानर कुळातील असे रामायण मानते. वानर ही जमात म्हणजे झाडावर राहणारी नव्हे तर ती एक आदिवासी जमात होती, असे काही संशोधक मानतात. त्यांच्या म्हणण्यानुसार नागालॅंडमध्ये राहणाऱ्या लोकांना जसे नागलोक म्हणतात, पण ते काही सरपटणारे नाग नाहीत. त्याचप्रमाणे वानर ही एक आदिवासी जमात होती आणि त्या जमातीतील वाली, सुग्रीव, हनुमान, अंगद असे वीर होते. त्यामुळे हनुमान हा वानर होता पण तो झाडावर राहणाऱ्या वानर जमातीतील खचितच नव्हता.
वरील कथेत इंद्राने हनुमानावर वज्रघात केला आणि त्याची हनुवटी दुखावली गेली. अशी कथा आहे. यातील मतितार्थ असाच की बाल मारुतीची हनुवटी लहानपणी कुठल्याशा कारणाने दुखावली. कदाचित त्यापाठिमागे हट्‌ट हे कारण असावे, पण ती हनुवटी दुखावणे हे पुन्हा त्याच्या वानरमुखी या विशेषणाला पाठिंबा देणारे आहे. तो वानरमुखी झाल्याने त्याला शेपटी लागली इतकंच.
हनुमान महाबली आहे हे सिद्ध झाले उत्तर रामायणात. राम-सुग्रीव भेटीनंतर रामाने हनुमानातील तेज ओळखले आणि सुग्रीवाने मंत्री करावे असा सल्ला दिला असावा. रामाने दिलेल्या सल्ल्यामुळे हनुमान हा रामाचा ऋणी राहून तो त्यांची भक्‍ती करु लागला असे म्हणण्यात काही अंशी जागा आहे. याचे प्रमुख कारण की हनुमान हा बलशाली होता, आणि तो काहीही करु शकत होता तर सुग्रीवाला वाली वधासाठी रामाचे सहकार्य घेण्याचे कारणच नव्हते. उलट हनुमान आणि सुग्रीव हे वालीपासून लपत -छपत होते. याचाच अर्थ तोपर्यंत हनुमानातील महा बल आणि बुद्धी अधोरेखीत झाली नव्हती. राम-रावण युद्धातही राम आणि लक्ष्मणाचेच पराक्रम जास्त दिसतात. तेथेही हनुमानाने कुंभकर्ण, इंद्रजित यांच्याशी सामना केलेला दिसत नाही.
आता हनुमानाने केलेल्या चमत्कारांची काही तार्किक उत्तरे सापडतात का हे बघता येईल. यातील प्रमुख मुद्दा हा की हनुमानाने सिंधु पार केला आणि तो लंकेत दाखल झाला.
यातील हनुमानाला आपल्या शक्‍ती माहित नव्हत्या आणि जांबुवंतादी लोकांनी त्याची स्तुती केल्यानंतर तो सिंधुपार करण्यास तयार झाला. यातील हा धागा खूप मोठा आहे. हनुमान नदीत खूप चांगला पोहणारा असाला पाहिजे. पण तो कधी समुद्रात पोहला नसणार. त्यामुळे समुद्र ल्लंघून जाण्याची हिंम्मत त्याच्यात होत नव्हती. त्याला लहानपणापासून ओळखणाऱ्या वानर सेनेतील मित्रांनी त्याची स्तुती केली की तू नदीमध्ये खूपकाळ पोहतोस. तार्कीक अंगाने त्यांनी समुद्रापासून लंका किती लांब आहे हेही सांगितले असणार, त्यामुळे हे अंतर पोहत जाणे तुला नक्‍की शक्‍य आहे हे त्यांनी त्याला वारंवार सांगितल्याने हनुमानाचे बाहू स्फूरण पावले आणि त्याने लंकेला जाण्यासाठी पाण्यात उडी टाकली. अपेक्षेप्रमाणे तो लंकेत पोचला.
हनुमान लंकेत पोचल्यावर त्याने वेशांतर करुन संपूर्ण लंका पिंजून काढली आणि सितेला शोधले.
आता हनुमानाने "लंका दहन केली' हा मुद्दा. हनुमानाने लंकेला आग लावली, हे खरेच. पण तेही रुपकात्मक घ्यायला हवे. हनुमान तिथे रामदूत म्हणून गेला असला तरी त्याचे प्राथमिक उद्दीष्ट हे तेथील राज्यव्यवस्था कशी आहे, राजा कसा कारभार करतो आणि लोकांच्या मनात त्याच्याबद्दल किती आदर आहे हे तपासण्याचा होता. पहिल्या प्रथम हनुमानाने रामाबद्दल प्रचंड कहाण्या सांगून राम-रावण युद्ध झाले तर रामच कसे जिंकतील हे तिथल्या लोकांमध्ये ठसवले. तेथील जनतेत असलेला राजवटीबद्दलचा असंतोष त्याने आणखी तीव्र करण्याचा प्रयत्न केला. लोक राजाबद्दल वाईट-साईट बोलू लागले. विस्तारभयास्तव इथे त्यातील बारकावे सांगता येत नाहीत, पण हनुमानाने अशा पद्धतीने लंकेत आग पेटवली की राजसत्तेचा स्वतःवरचा विश्‍वास उडाला. त्यामुळे खच्चीकरण झालेल्या रावण सैन्यावर विजय मिळविणे रामाला शक्‍य झाले.
हनुमानाने द्रोणागिरी आणला ः हनुमानाने द्रोणागिरी आणला हे मिथक तर खूपच मजेशीर आहे. लक्ष्मण मुर्च्छित झाल्यानंतर हनुमानाला द्रोणागिरी पर्वतावरुन संजिवनी वनस्पती आणायला सांगितले होते. त्याचे वर्णनही करण्यात आले होते. पण द्रोणागिरी पर्वतावर गेल्यावर हनुमान थोडा शंकीत झाला. एकसारख्या दिसणाऱ्या अनेक वनस्पती दिसल्याने त्यातील सर्वच वनस्पती तो घेऊन आला. आता तिथे उपस्थित लोकांनी त्याला "द्रोणागिरीच आणलास की' असेच संबोधले असणार, नाही का? त्यामुळे तो द्रोणागिरी उचलणारा ठरला. आता ही घटना घडली लंकादहन झाल्यानंतर. त्यामुळे सहाजिकच हनुमान हा बलशाली आहे आणि तो प्रचंड बुद्धीचा आहे हे मान्य करावे लागते. खरे तर हनुमान हा चांगला मंत्री, लढवय्या सैनिक, उत्तम गुप्तहेर आणि सेवेकरी होता हे निश्‍चितच.
...............................................................................................................

4. दत्तावतार आणि एकूणच दैवतांची निर्मिती


देवाची निर्मिती ही खरेच गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. जगभरातल्या विचारवंतांनी देव या संकल्पनेची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला आहे, पण कोणालाच देवाला शब्दांच्या व्याख्येत बसवता आलेले नाही. आंतरजालावरील विकीपिडीयामध्ये देव या संकल्पनेबद्दल विस्तृत माहिती दिली आहे. तरीही त्यामध्ये देवाची व्याख्या परिपूर्ण अशी केलेली नाही. आपल्याकडे संतांपासून ते महंत विभूतींपर्यंत अनेकांनी देव म्हणजे कोण हे सांगितले आहे. विश्‍वरचनाकार ही एक व्याख्या किंवा अर्थ सर्वच धर्मात लागू होतो. अद्वैत आणि द्वैत याबाबत हिंदू धर्म आणि इतर धर्मात मतभेद असले तरी तेही देव या संकल्पनेबाबत नाहीत तर देवाच्या अस्तित्वाबाबत आहेत. जगभरातील बहुतेक संत, प्रेषितांनी देव आणि दैव या संकल्पनेबाबत विवेचन केले आहे, पण त्यातही निराकार देव मानायचा की प्रेषीताला देव मानायचे याबाबत मतभेद आहेत. याचा सर्वात जास्त गोंधळ हा हिंदू धर्मात आहे. मुळात हिंदू धर्म ज्याला प्रमाण मानतो त्या वेदांमध्ये देव म्हणजे निराकार शक्‍ती असाच उल्लेख आहे. तरीही निर्माणकर्ता, पालनकर्ता आणि संहारकर्ता अशी देवांची रुपे मान्य केली आहे. आणि त्याबरोबरच अवतार ही संकल्पनाही पुढे जाऊन पुराणांनी मान्य केली आहे. खरे बघता मुळात अवतार ही संकल्पना वैष्णवांनी आणली आणि मग त्यामागोमाग शैव लोकांनी स्वीकारली आणि मग ओंकाराची अर्थात गणेशाचेही अवतार अवतर गेले.
दुष्टांचा नाश करण्यासाठी देव अवतरतो आणि तो ज्या रुपात येतो तो अवतार, असे हिंदू पुराण मानतो. खरे तर  प्रत्येक प्राणीमात्रात देव हीच संकल्पना संकुचित रुपाने येथे मानली गेली आहे. विष्णुच्या दहा अवतरांपैकी वराह, नरसिंह, मत्स्य, कुर्मादी अवतार हे मानवी देहाचेही नाहीत. तत्कालीन परिस्थीतीत जे उपयोगी आले त्याला देव मानले गेले किंवा ते अवतार मानले गेले, असे म्हणता येईल. या अवतारांबाबत सविस्तररित्या अन्य लेखात मांडले आहेच, इथे याचा उल्लेख फक्‍त अवतार ही संकल्पना का अवतरीत झाली यासाठी. दुष्टाचा  नाश आणि सुष्ट समाजाची पुनर्स्थापना करण्यासाठी वेगवेगळ्या काळात देवाने अवतार घेतले असे पुराण मानते. तरीही काही दैवते यापेक्षा अन्य कारणांनी अवतरीत झाली. ती का आणि कधी, याचा धांडोळा घेतला तर देव या कल्पनेसोबतच असलेला सामाजिक, राजकीय आणि मानवी इतिहास लक्षात येईल.
दत्त या दैवताबाबतही असेच म्हणता येईल. दत्त दैवताचा उल्लेख अनेक पुराणांतून झाला आहे. मिथकांमध्ये अडकलेल्या देवाला जर वास्तवात आणले तर त्याचे दर्शन अनेक रुपात होते. दत्त दैवताबाबतही असेच म्हणता येईल. मुळात तीन शिरे आणि एक देह असा काही दत्ताचा वावर होत नाही, तर त्याचा दृष्टांत होतो, हे पुराणकरांनाही मान्य आहे.

त्रिखंडात भ्रमण करणाऱ्या नारदमुनींनी अनुसयेच्या पातिव्रत्येचा महिमा शंकर, विष्णू व ब्रह्मदेव यांच्या पत्नी अनुक्रमे उमा, लक्ष्मी आणि सावित्री यांच्याजवळ गायिला. नारदाच्या त्या गौरवोद्गाराने त्या तिघींच्या मनात मत्सर उत्पन्न झाला. त्यांनी शंकर, विष्णू व ब्रह्मदेव यांना अनुसयेचे सत्त्वहरण करण्यासाठी सांगितले. स्त्री हट्‌टापासून हे देवही वेगळे राहू शकले नाहीत आणि ते अनुसयेचे सत्व हरण करण्यासाठी भूलोकी आले. हे तीनही देव अत्री ऋषींच्या आश्रमात आले. त्यावेळी आश्रमात ऋषी नसल्याने माता अनुसयेने या अतिथीरुपी देवांचे स्वागत केले; आणि त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था केली.
त्र भोजनावेळी तिन्ही देवांनी अनुसयेसमोर अट घातली; ते म्हणाले "तू विवस्त्र होऊन आम्हांस भोजन घालशील तरच आम्ही तुझ्या हातचे भोजन स्वीकारू आणि तृप्त होऊ' अनुसयेस गृहस्थधर्म पाळण्याचे बंधन होते तेव्हा त्यास अनुसरून तिने पतीचे अर्थात अत्री ऋषींचे स्मरण करून अतिथींच्या बोलण्यास होकार दिला.
अनुसयेने त्या तिघा अतिथींच्यावर आपल्या पतीचरणांचे तीर्थ शिंपडले. त्याच क्षणी त्या तीनही अतिथींचे अर्थात भगवान शंकर, विष्णू व ब्रह्मदेव यांचे रूपांतर बालकरूपामध्ये झाले. पुढे अनुसयामातेने विवस्त्र होऊन मातृत्वाच्या भूमिकेतून त्यांना ममतेने जेऊखाऊ घातले, भरविले. जगताची निर्मिती, पालन आणि विनाश करणारे ते तीनही बलिष्ठ देव बालरूपांमध्ये बद्ध होऊन ऋषीआश्रमात अडकून पडल्याचे कळताच उमा, रमा व सावित्री पतिशोधार्थ अत्री ऋषींच्या आश्रमात दाखल झाल्या. सतीत्वाच्या सामर्थ्यांने अनुसयेने आपल्या पतींना लहान बालकांच्या रूपात परिवर्तत केल्याचे पाहून तसेच आपल्या पतींची दुःखित व दीन अवस्था पाहून त्या तिघींना अतीव दुख झाले. त्यांनी अनुसयेपाशी पश्‍चात्तापदग्ध स्वरात दयेची याचना केली, तशी अनुसयेने तीनही देवांना पूर्ववत रूप दिले. अनुसयेच्या सत्त्वसाक्षात्काराने संतुष्ट झालेल्या देवांनी त्या पतिव्रतेच्या इच्छेनुरूप तिच्या पोटी जन्म घेण्याचे मान्य केले. योग्य वेळी अनुसयेला विष्णूच्या अंशाने दत्त, शिवाच्या अंशाने दुर्वास व ब्रह्मदेवाच्या अंशाने सोम (चंद्र) असे तीन पुत्र झाले. पुढे दुर्वास आणि चंद्र आपल्या विहित कार्यासाठी निघून गेले आणि आपला अंश त्यांनी दत्तस्वरूपात कायम स्थिर केला. हीच श्रीदत्तात्रेयांच्या उत्पत्तीविषयीची सर्वमान्य आणि लोकप्रिय कथा आहे.
दत्त हा शब्द उच्चारला तर आपल्या डोळ्यासमोर येते ती तीन शिरे आणि सहा हात असलेली देवता. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा मिलाफ असलेली देवता. या देवतेची निर्मिती मुळात पंथात अडकलेल्या हिंदू धर्माला बाहेर काढून त्याला सनातन धर्माकडे पुन्हा वळवावे याच उद्देशाने झाली, यात शंका नाही. दत्त कार्य आणि तत्कालीन परिस्थिती बघितली तर या तर्काला पाठबळच मिळते. शैव, वैष्णव, शाक्‍त, गाणपत्य आदी मतांचे अनुयायी आपलेच इष्ट दैवत हे श्रेष्ठ आणि इतर अन्य देवता या दुय्यम असा अभिमान बाळगू लागले त्यावेळी समाजातील काही जाणत्या लोकांनी या सर्वांना एकत्रीत बांधणारा असा दुवा शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून दत्त दैवताचा जन्म झाला. त्यामुळेच त्याच्यात सर्व देवतांचे सार मिसळले असल्याने त्यापासून कुठलाच पंथ दूर जाऊ शकत नव्हता. विशेष म्हणजे या देवतेचे अवतार कार्य अखंड सुरु आहे. यातही श्री दत्त या देवतेचेही अवतार झाले आहेत. श्रीपादवल्लभ हे पहिले दत्तावतार. त्यांनी बहुतेक सर्वपंथांना एकत्र आणून हिंदू धर्मातील वैदीक परंपरेचे जणू पुनरुज्जीवन केले. तर दुसरे नृसिंह सरस्वती. गुरुचरित्र हा दत्तोपासकांचा पाचवा वेदच. यातील म्लेंच्छादी उल्लेख वाचला की लक्षात येते की यवनी सत्तेपासून हिंदू धर्माच्या रक्षणासाठीच या देवतेची निर्मिती झाली आहे. यात पंथात अडकलेल्या लोकांना एकत्र करण्यासाठी एकच एक देव न मानता तिन्ही देवांचे एकत्रीत रुप मान्य केले गेले आहे. त्यामुळे दत्त या देवतेची निर्मिती सामाजिक आणि राजकीय परिस्थीतीमुळे झाली हे मान्य करावे लागते.

.............................................................................................................

5. इंद्र


भारतीय पुराणांमध्ये सर्वात जास्त वादात अडकलेला देव म्हणजे इंद्र. अहिल्येचे शील हरणारा, विश्‍वामित्रांची तपश्‍चर्या भंग करण्यासाठी अप्सरेला पाठवणारा, तारकासुराच्या आक्रमणानंतर स्वर्गलोक सोडणारा, ध्रुवाची तपश्‍चर्या मोडण्यासाठी प्रयत्न करणारा... अनेक रुपात इंद्र पुराणकथांमध्ये सापडतो. विशेष म्हणजे तरीही तो स्वर्गाचा राजा आहे आणि तेथून तो सर्व देवांवर राज्य गाजवितो. त्यामुळे इंद्र समजावून घेण्यासाठी अगोदर स्वर्ग समजणे आवश्‍यक आहे. स्वर्ग म्हणजे काय? त्याचे प्रयोजन काय? आणि त्याचा राजा कोण होतो? का होतो?...

स्वर्ग
विष्णू पुराणानुसार कृतक त्रैलोक्‍य... भू भुवः आणि स्वः हे तीन लोक मिळून कृतक त्रैलोक्‍य म्हणवले जातात. सूर्य आणि ध्रुवाच्या मध्ये स्वर्ग असल्याचे मानले जाते. भारतीय पुराणांनी सर्वच धर्मांप्रमाणे पाप-पुण्य मानले आहेत. त्याचबरोबर काही पुरुषार्थही मानले आहेत. पुरुषार्थांमध्ये मोक्ष हा सर्वात महत्त्वाचा आणि मोठा पुरुषार्थ मानला गेला आहे. पण सर्वच पुण्यवंताना मोक्ष मिळत नाही, मग त्यांचा पुनर्जन्म होतो असेही वैदीक पुराणे मानतात. सनातनी धर्म हा पुनजर्न्मावर विश्‍वास ठेवणारा असल्याने ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही  योजनाही केल्या आहेत, त्यातील एक योजना म्हणजे स्वर्ग. स्वर्गाचे स्थान तर पुराणांनी सांगितले तसेच त्याचे प्रयोजनही सांगितले आहे. तुम्ही खूप पुण्यवान असाल तर तुम्हाला गती किंवा मोक्ष प्राप्त होतो, पण जर तुम्ही पापी नसाल आणि तुमचे पुण्य मोक्षप्राप्तीएवढे नसेल, तर काय? तर पुन्हा जन्म-मृत्यूचा फेरा. पण त्यातही तुमचे पुण्य शुन्य करुन मगच जन्म मृत्यूचा फेरा करण्याचे काम हा स्वर्ग करतो. त्यासाठी याचे प्रयोजन आहे. स्वर्गात सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा आहेत. तिथे यातनांना थारा नाही. स्वर्गाच्या राजधानीला अमरावती म्हणतात आणि तिथे इंद्र नावाचा राजा राज्य करतो, त्याचे वाहन ऐरावत नावाचा हत्ती आहे.

आत्म्यांचे विश्रांतीस्थळ असलेल्या स्वर्गामध्ये सगळेच देव आहेत. पण तिथे सगळेच आत्मे असल्याने त्यांच्यातील आसुया, द्वेष आणि मत्सर या गोष्टीही तशाच पुढे आल्या आहेत. हे पुराणांनी मान्य केले आहे. त्याची तर्कावर बांधणी करताना जुन्या पुराणातील गोष्टी आहे तशाच्या घ्याव्या लागतात. तर्कावर घासलेली एक गोष्ट पुराणांतील इतर गोष्टींवर तर्क लढविताना उपयोगी येत नाही. कारण त्या कड्या एकमेकांशी घट्‌ट बांधलेल्या असतात. त्यामुळे त्या कड्यांच्या मूळ साच्यासहच विचार करावा लागतो. त्यामुळेच स्वर्ग लोकीच्या देवतांमध्ये असुया, द्वेष आणि मत्सरादी भावना होत्या हे वारंवार दिसते. पुत्रप्रेमामुळेच इंद्राने अर्जुनाला अस्त्र दिल्याचे उदाहरण आहे तर हनुमानासाठी वायू व्याकूळ झाल्याचेही उदाहरण आहे. त्यामुळेच स्वर्गातील देव-देवता म्हणजेच पुण्यवान परंतु अजूनही ज्यांच्या षड्रिंपू शिल्लक आहेत अशा आत्म्यांचे निवासस्थान असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. त्यामुळेच तेथील एकही गोष्ट कायमस्वरुपी नाही. इंद्र हे पद आहे, तसेच इतर देवता म्हणजे ते कार्य करणारे देव नसून तीही पदे आहेत. ज्या आत्म्याचे पुण्य सर्वात जास्त तो इंद्र. तर उर्वरित आपापल्या पुण्याप्रमाणे पदे सांभाळणारे. एखाद्या कॉर्पोरेट कंपनीचे कार्यालय ज्या प्रमाणे चालते अगदी तसेच स्वर्गाचा कारभार चालतो. इंद्र हा राजा, त्याची पत्नी शशी, त्याचा सल्लागार बृहस्पती ऋषी इत्यादी प्रकार सापडतात. त्यामुळे इंद्रादी देव हे कायमस्वरुपी नसून ते बदलत असतात आणि त्यांच्या जागी दुसरे लोक घेतले जातात. त्यामुळे अहिल्येच्या रुपाने भाळलेला आणि तिचे शील हरण करणारा इंद्र आणि विश्‍वामित्राची तपश्‍चर्या भंग करण्यासाठी अप्सरेचा वापर करणारा इंद्र वेगळा वेगळा आहे. स्वर्गात भोगाची सगळी साधने आहेत. तिथे हे भोग भोगल्यानंतर पुण्य कमी होते आणि आत्म्याला नवे शरीर घ्यावे लागते हा तर्क, त्यामुळेच तेथील इंद्र पदच्युत होऊ शकतो. तपश्‍चर्येने तारकासूर किंवा रावणपुत्र इंद्राला पदच्युत करु शकत होते हेच यावरुन समजते.

इंद्र हा खरे तर वैदीकांचा देव. सनातनी धर्मात इंद्राला प्रचंड महत्त्व होते, परंतु नंतर आर्य आणि अनार्यांच्या मिश्रणाच्या काळात आर्यांचा इंद्र देव मागे पडत गेला आणि अनार्यांची दैवते पुढे आली. यामध्ये गणपती किंवा गणेशाचे नाव घेता येईल. ब्रह्मा विष्णू महेश या देवांचे महत्त्व वाढले गेले. त्यामुळे आपसूकच इंद्राचे महत्त्व कमी झाले. आर्यांनी इंद्राचे महत्त्व कमी झाल्याचे मान्य करताना विष्णूचे महत्त्व वाढवले. अर्थात ते महत्त्व वाढविण्यामागे तत्कालीन परिस्थितींचा अभ्यास करणे आवश्‍यक आहे. राजाला विष्णुचा अवतार मानण्याची परंपरा त्याच दरम्यान सुरु झाल्याचे दिसते. इंद्र देवतेबद्दलचे प्रवाद आणि त्या देवतेने केलेले प्रमाद हे मानवी गुणावगुणांसारखेच आहेत. इंद्र हा मानवी मनाचा आरसाच आहे.
...................................................................................................


6. 33 कोटी देव आणि गाय


भारतीय संस्कृतीत 33 कोटी देव असल्याचे मानले जाते. वेदांपासून पुराणांपर्यंत त्याचा उल्लेख आढळतो. अनेकदा नास्तिक आणि धर्मावर टीका करणाऱ्या लोकांकडून याची टर उडविली जाते. 33 कोटी देव ही संकल्पना कशी आली आणि त्याचा अन्वयार्थ काय हे बघितले तर आपल्या पुर्वजांनी अशी विधाने का केली होती हे स्पष्ट होते. मुळात 33 कोटी म्हणजे काय हे बघितले पाहिजे. एखाद्या शब्दाला काही काळानंतर विशिष्ट अर्थ प्राप्त होतो. तो त्याचा मूळ अर्थ असतोच असे नाही. साधं उदाहरण देता येईल. बोफोर्स म्हणजे भ्रष्टाचार असा एक अर्थ आपल्याकडे रुढ झाला. बोफार्स तोफा खरेदीत खरोखरच भ्रष्टाचार झाला की नाही हा प्रश्‍न असला तरी बोफोर्स तोफांचा अर्थ जाऊन तिथे भ्रष्टाचाराचा अर्थ आला. आता त्या मूळ शब्दाचा दोष नाही. त्याचे संदर्भ बदलले. आपल्याकडे प्रत्येक गोष्टीत देवाला बघण्याची संस्कृती आहे. याच संस्कृतीचा भाग म्हणून याकडे बघितले पाहिजे. चराचरात देव आहे हे सांगण्यासाठी 33 कोटी देव हे वाक्‍य आले. आता त्या वाक्‍याला आणि आकड्यालाच जर आपण बांधून घेतले तर मग विचार खुंटतो. आपल्या पुर्वजांना एवढेच सांगायचे होते की निसर्गातील प्रत्येक गोष्टीचं जतन करा आणि ते वाढवा. कारण त्यात देव आहे. जे आज पर्यावरणवादी सांगताहेत तेच आपले ऋषी सांगत होते एवढेच.

राहिली गाय.
गाय एक उपयुक्‍त प्राणी आहे हे सांगायला काही संशोधनाची गरज नाही. पण ती केवळ उपयुक्‍त प्राणी आहे हे  सांगितल्यावर तिची काळजी घेतली जाईल हे मानने हे बाळबोध होते. लहान मुलांना सांगितले की हे कडू औषध घेणे तुझ्या आरोग्यासाठी किती हितकारक आहे, तरी ते हट्‌टाने ते नाकारतं. पण तेच औषध साखरेचा मुलामा लावून दिले तर मूल खाते, हे आपल्या ऋषींनाही माहित होते. त्यामुळे अनेक गोष्टींना त्यांनी दैविकरणाची साखर लावली. मात्र आपण त्या साखरेलाच देव मानू लागलो आणि आतील औषध कुठे आहे, असे विचारु लागलो. गायीबाबतीतही तेच झाले. आपल्या गोठ्यातील जनावराची काळजी घेतली पाहिजे हे त्याकाळात ऋषीच सांगत होते. (त्या काळी माणसाचे आणि जनावरांचे डॉक्‍टर असे काही वेगळे नव्हते, सगळेच वैद्य सगळयाच प्राण्यांवर उपचार करत.) त्यामुळे गायीची निगा घ्या कारण ती देव आहे हे त्यांचे सांगणे बरोबरच होते. त्यामुळे गाय काय खाते आणि काय शेणते या भौतिक गोष्टींवर चर्चा करुन देवाचे दैवत्व कमी करण्यात अर्थ नाही. त्यातील मतितार्थ लक्षात घेतला तर गायच नव्हे तर प्रत्येक प्राण्यात देव दिसेल. तिची पूजा करण्याचे कर्मकांड करण्यात काहीच अर्थ नाही, पण तिची निगा राखणे हिच तिची पूजा आहे.
.........................................................

7. सण आणि त्या मागील कारणेः


कृषीप्रधान असलेला भारतात कृषी संस्कृतीचा विकास अन्य कोणत्याही देशात झालेला नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही कृषीशी संबंधीत आहे. आपले सणवार हे कृषीसंस्कृतीशी समरस झाले आहेत. दसरा असो वा दिवाळी. नागपंचमी असो वा बैलपोळा. बारा महिन्यात बारा सण साजरे करताना आयुर्वेदाने सांगितलेला आहार घ्यावा  आणि कृषीसंस्कृतीचा विकास होत राहावा हेच आपल्या ऋषीमुनींना सांगायचे होते. त्यामुळे त्यांनी प्रत्येक महिन्यात सणवार करुन लोकांना त्या माध्यमातून आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहार घेण्यास प्रवृत्त केले. अर्थात सर्वसामान्य प्रकृतीच्या माणसांसाठी तो आहार असल्याने त्याकडे त्याच दृष्टीने बघितले पाहिजे.
गुढी पाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढी पाडवा साजरा केला. नव्या वर्षाची सुरवा गुढ्या उभारुन केली जाते. पोळीबरोबर कडूनिंबाची पाने खाल्ली जातात. आता यातील कडूनिंब हा आयुर्वेदाने किती उपयुक्‍त आहे हे सांगितले आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी केवळ चवीसाठी खाऊ नका तर आरोग्यासाठी खावा असा संदेश आपल्या ऋषीमुनींनी दिला आहे. त्यातील गुढी उभारण्याचे कर्मच तेवढे आपण घेतले. शेतीत राबणाऱ्या बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी बेंदूर किंवा बैलपोळ्याला बैलाची पूजा केली जाते. कृषीची कामे थोडी थंड पडल्यानंतर निवांत वेळीच हा सण येतो. याच कडीतील दुसरा सण म्हणजे नागपंचमी. खरे तर बैल जसा शेतात राबून शेतकऱ्याला मदत करतो तसा नागही मदत करतो. नाग म्हणजे सगळेच सर्प. पाऊस पडलेला असतो. बिळात पाणी गेल्याने अनेक सर्प सरपटत शेतात दिसू लागतात. त्यामुळे त्यांचे संरक्षण केले जावे याची काळजी ऋषींनी घेतली आहे. सापांचा उंदीर हे प्रमुख खाद्य आणि तोच उंदीर शेतकऱ्यांचा शत्रु. त्यामुळे पावसाळ्यात भीतीपोटी जर शेतकऱ्यांनी सापांना मारले तर पिके भरीस येतील त्यावेळी उंदरांपासून त्यांचे संरक्षण कोण करणार हा प्रश्‍न ऋषीमुुनींनाही पडला होता. त्यामुळे ज्या काळात साप बाहेर दिसू लागतात त्या काळात त्यांनी नागपंचमी हा सण तयार केला. त्याला मारु नये हे पटवून देण्यासाठी त्याचे दैवीकरण केले. गंम्मत बघा गणपतीचे वाहन उंदीर आहे पण उंदराची पुजा केली जात नाही. उंदीरबीज नावाचा सण आहे  पण त्या दिवशी मटण खाण्याचा प्रघात आहे. त्यामुळे उंदराला मारावे हाच संदेश ऋषीमुनींना द्यायचा होता हे निःसंशय खरे. दसरा आणि दिवाळीमध्ये सुगी येते. दसऱ्याला बहुतेक पिके पोटरीला आलेली असतात. शेतात काम करण्यासारखी स्थिती खूप कमी असायची.(अलिकडे पावसाच्या नव्हे तर बाजाराच्या संकेतानुसार शेती केली जात असल्याने तो नियम आता लागू होत नाही). त्यामुळे हा काळ देवाच्या स्मरणात घालवावा. थोडी विश्रांती घ्यावी. पचनसंस्था आणखी चांगली करण्यासाठी उपवास करावा हा त्यामागचा हेतू होता. पुढे येणाऱ्या सुगीची तयारी करावी यासाठीच या सणाची निर्मिती झाली आहे. दिवाळी हा आनंदोत्सव यासाठीच केला जातो. खरीप पिकांची काढणी झालेली असते. घरदार अन्नधान्याने भरलेले असते. कामाचा शीण घालविण्यासाठी आणि येणाऱ्या थंडीत अंगात उष्णता राहावी यासाठी गोडधोड पदार्थ केलेले असतात. त्याचा आस्वाद घ्यावा, आनंद साजरा करावा आणि थंडीला सामोरे जाण्याची तयारीही करावी हा यामागचा हेतू आहे. संक्रात तर थंडीत शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थ पोटात जावे याचसाठी निर्माण केलेला सण आहे.


एकूण काय, काहीही कारण नाही आणि उगाच सण केलेत असा एकही सण भारतीय संस्कृतीत नाही. त्याची कर्मकांडे चुकीची असतील, आहेतच. काही काही तर निरुपयोगीही आहेत पण त्यामागचा हेतू वाईट नव्हता, अशास्त्रीय तर नव्हताच नव्हता. त्यातील कर्मकांड बाजुला केले तर आपले सण साजरे करणे हे आपल्यासाठी किती गरजेचे आहे हेच दिसून येईल.

मंगळवार, २५ सप्टेंबर, २०१२

अजितदादांची अडीच घरे



अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदासह सर्वच मंत्रीपदांचा राजीनामा देऊन महाराष्ट्रातील राजकारणाला वेगळे वळण दिले आहे. त्यांनी उगारलेले राजीनामाअस्त्र म्हणजे जाळ्यात अडकलेल्या पक्ष्यांना हाकारी देण्याचाच प्रकार आहे. यात आता जाळ्यासह सगळे पक्षी उडून जाण्यात यशस्वी होताहेत का? की शिकारी यशस्वी होतो हे काळच ठरवेल. aमात्र, आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत या राजकीय खेळीचे बरे-वाईट परिणाम दिसतील हे मात्र खरे.

............................................
सिंचन प्रकल्पातील घोटाळ्याबाबत होत असलेल्या आरोपांना उत्तर न देता त्यांची निष्पक्षपाती चौकशी व्हावी, म्हणून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदासह आपल्याकडील इतर मंत्रीपदांचा राजीनामा दिला. अजित पवार यांच्या कामाची पद्धत, त्यांची निर्णय घेण्याची पद्धत आणि त्यांचा समाजातील आणि राजकारणातील वावर जर बघितला तर हा निर्णय धक्‍कादायकरित्या आला असला तरी अनपेक्षित नाही. सत्तेला चिकटून राहणारा मी नाही हे त्यांनी राजीनामा दिल्यानंतर सांगितलेला मुद्दा खरा आहे, फक्‍त तो अर्धवट खरा आहे. अजित पवारांसारख्या नेतृत्वाला विभागून सत्ता नको असते, त्यांना पूर्ण सत्ता हवी असते. अजित पवार यांनी त्याचसाठी राजीनामा दिला आहे हे स्पष्ट आहे. पण आगामी विधानसभा निवडणुकीत किती आकडे त्यांच्या बाजूने झुकताहेत यावर त्यांचे हे पूर्ण सत्तेचे स्वप्न अवलंबून आहे.
सिंचन प्रकल्पात घोटाळा झाला का? झालाच असेल तर त्याचा फायदा अजित पवारांनी स्वतःसाठी करुन घेतला की राष्ट्रवादी कॉंग्रेसला करुन दिला की अजित पवारांच्या कामाच्या धडाक्‍याचा इतरांनी लाभ घेतला? या प्रश्‍नांची उत्तरे चौकशीतून पुढे येतीलच पण महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीचा विचार करायचा झाल्यास सध्या तरी अजित पवारांनी बुद्धिबळ पटावरील घोड्याची अडीच घरांची चाल खेळली आहे, यात त्यांना राजाला शहही द्यायचा आहे, आपली प्यादीही वाचवायची आहेत आणि जमल्यास पटावर नवा खेळही मांडायचा आहे. यातील कोणतेही दोन उद्देश यशस्वी झाले तरी तिसरा आपोआप मागून चालून येईल यात शंका नाही.
2004 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा जिंकूनही मुख्यमंत्रीपदापासून दूर व्हावं लागलं होतं, याचं सर्वाधिक शल्य अजित पवार यांना बोचतं. त्यावेळी जर पक्षश्रेष्ठींनी पुढाकार घेतला असता तर मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी कॉंग्रेसलाच मिळाले असते, असे त्यांनी उघडपणे सांगितले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी भूमिका वठविण्यास अजित पवार तयार आहेत, किंवा त्यांची तशी सुप्त इच्छा आहे हे काही गुपीत नाही. अजित पवारांच्या गटातील आमदारांनी केलेल्या "लॉबींग'मुळेच उपमुख्यमंत्रीपदाची माळ पवारांच्या गळ्यात पडली होती, त्यावेळी ज्येष्ठ-श्रेष्ठ असलेल्या छगन भुजबळांनाही डावलल्याची भावना काही लोकांच्या मनात होती, पण त्याकडे दुर्लक्ष करुन राष्ट्रवादीने अजित पवारांचा मार्ग मोकळा केला होता. पण त्यातूनच महाराष्ट्रात राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार आणि अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी हे नवे समीकरण उदयास आले. अजित पवारांची पक्षावरची पकड इतकी घट्‌ट बनली की त्यानंतर त्यांनी आपल्याला हवे असलेले आणि ज्यातून राज्याला काम दिसेल अशी खाती घेतली. ऊर्जा आणि वित्त ही खरे तर दोन स्वतंत्र मंत्र्यांची खाती असताना अजित पवारांनी हट्‌टाने ती आपल्याकडे ठेवली, या पाठिमागे एकच कारण होतं ते म्हणजे राज्य जर भारनियमनमुक्‍त करायचे असेल तर त्यासाठी वेगवेगळे प्रकल्प राबविणे आवश्‍यक होते, त्यासाठी वित्त मंत्रालयातून कोठेही आडकाठी आणली जाऊ नये, याचाच अर्थ असा की आपले काम करताना कोणाची आडकाठी नको ही भूमिका त्यांनी कायम ठेवली आहे. राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला स्वबळावर सत्ता मिळवून देऊन, प्रसंगी काही कमी जागा मिळाल्या तर कॉंग्रेसला बाजूला सारुन शिवसेनेसारख्या पक्षाला बरोबर घेऊन सत्तेपर्यंत अजित पवारांना पोचायचे आहे.
काम करणाऱ्या नेत्याची आपल्याकडे पूर्ण सत्ता असली पाहिजे ही महत्त्वाकांक्षा अयोग्य नाही. ती त्याने बाळगलीच पाहिजे. सिंचन घोटाळ्याच्या फडताळात काहीच सापडणार नाही हे अजितदादांना माहित आहे. पण त्याचा वापर करुन जर कोणी त्यांची बदनामी करत असेल तर त्यांना ती करु न देता फेकलेल्या दगडांचा मैलाचा दगड करण्याची त्यांची नीती आहे.
राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. काही वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्या सुपारी घेतल्यासारख्या त्यांच्या पाठिमागे लागल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीमधील कार्यकर्त्यात भ्रम निर्माण होण्याची शक्‍यता नाकारता येत नव्हती, अशावेळी जोराचा धक्‍का देऊन लोकांच्या कानातील पाखरे उडविण्याची गरज होती, ती आजच्या धक्‍क्‍याने अजित पवारांनी केली आहे.
अजित पवारांना पक्षश्रेष्ठींनी राजीनामा द्या ,असे सांगितलेले नाही तर त्यांनी तो आपणहून दिला आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत पक्ष राहिला आहे. पक्षाच्या मंत्र्यांनी दिलेला राजीनाम्यातून हेच दिसते की अजित पवार एकटे नाहीत. याबरोबरच राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबाबत असलेला रागही यानिमित्ताने व्यक्‍त केला. एकपक्षी कारभार असल्याप्रमाणे पृथ्वीराज चव्हाण यांचे चालले असलेले काम राष्ट्रवादीच्या अनेक मंत्र्यांना मान्य नाही. त्यामुळे त्यांच्याजागी दुसरा नेता असावा अशी त्यांची मागणी आहे. पण कॉंग्रेसच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? हा प्रश्‍न होता. मुख्यमंत्री स्वच्छ प्रतिमेचे असल्याचे मिडीया वारंवार सांगत असल्याने ते कासवगतीचे असल्याचा प्रचार राष्ट्रवादीच्या गोटातून सुरू झाला, पण त्यालाही मुख्यमंत्र्यांनी आकडे फेकत उत्तर दिल्याने त्यांच्या विरोधात मुद्दा राहिला नव्हता. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गटात अस्वस्थता होती. त्याला बाहेर काढण्याचे कामही अजितदादांच्या या खेळीने झाले आहे. त्यांनी राजीनामा देऊन एकप्रकारे आपले पंख पसरले आहेत, म्हणूनच त्यांच्या पंखाखाली जाण्यासाठी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी तातडीने राजीनामे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडे दिले. त्यामुळे या खेळीने राजाला शह देण्याचा एक प्रयत्न तरी बऱ्यापैकी साधला गेलाय हे निश्‍चित, पण शहाबरोबर काटशहही असतो हे अजितदादांनाही माहीत असणार आहे. त्यांनी ही घोड्याची अडीच घरांची चाल खेळली आहे खरे पण आता त्यांना इच्छा असली तरी सरळ खेळी करता येणार नाही, त्यांना आता राजाच्या घरात अडीच घरांची खेळी करतच जायला लागेल. एवढे मात्र खरे महाराष्ट्रात 2014 ची निवडणूक पक्षांपेक्षा नेत्यांत रंगेल आणि त्यात पुढे असतील अजित पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे. कॉंग्रेस नेहमीप्रमाणे दिल्लीकारांवरच अवलंबून असेल.

मंगळवार, १८ मे, २०१०

मनसे-शिवसेना युती होणारच




महाराष्ट्र नवनिर्मान सेना आणि शिवसेना यांच्यात फरक करायचा झाल्यास केवळ दोनच गोष्टींचा फरक करता येतो एक शिवसेनेचे नाव शिवसेना आहे तर मनसेचे नाव मनसे आहे, दुसरे शिवसेना उद्धव ठाकरे चालवितात तर मनसे राज ठाकरे. यापेक्षा या दोन्ही पक्षांच्या विचारात फरक नाही. शिवसेना हिंदूत्ववादी स्वतःला समजत असली तरी मनसेने स्वतःला धर्मनिरपेक्ष वगैरे काही समजलेले नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांचे विचार ( आणि अविचार सुध्दा) सारखेच आहेत.


प्रवीण कुलकर्णीpravinmila@gmail.com


अंबरनाथच्या नगराध्यक्ष निवडीनंतर संपूर्ण महाराष्ट्रात मनसे आणि शिवसेना एकत्र यावी, अशी चर्चा सुरु झाली. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची चांगला छायाचित्रकार म्हणून केलेली स्तुती आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपले पुस्तक राज यांना भेट म्हणून दिल्याची बातमी यांमुळे दोन्हीकडून एक एक पाऊल पुढे टाकल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यातच आज गोपीनाथ मुंडे यांनी औरंगाबादेत राज-उद्धव एकत्र आल्यास सेना-भाजप युतीची ताकद वाढेल असे विधान केले. साऱ्यांनाच मनसे आणि शिवसेना एकत्र यावी वाटते आहे मग माशी शिंकतेय कुठे.....
भारतात पक्षांची संख्या मोजली तर ती हजाराच्या घरात जाईल पण यांत विचारांत फरक करायचा झाल्यास अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेही विचार समोर येत नाहीत. कॉंग्रेसला कसला विचारच नाही तर भाजप विचारांच्या गर्तेतच सापडला आहे. प्रमुख राष्ट्रीय पक्षांची ही अवस्था आहे तर या दोन्ही पक्ष्यांच्या कळपात सामील होणाऱ्यांचीही तिच दिशा आहे. त्यामुळे दरवर्षी याच पक्षाच्या खोडातून तयार झालेल्या फांद्या कोसळतात, काही काळ तग धरण्याचा प्रयत्नही करतात आणि पुन्हा केव्हा बांडगूळ होऊन त्या झाडावरच अवलंबून राहातात हे कळतच नाही. त्यामुळेच राजकारणात वेगळे प्रवाह तयार झाले नाहीत. जुन्या प्रवाहातूनच अनेक ओढे नाले वाहात राहिले, राहत आहेत. त्यामुळेच कॉंग्रेसमधून फुटलेला राष्ट्रवादी पुन्हा कॉंग्रेसशीच आघाडी करुन सत्तेत सहभागी झाला तर कम्युनिस्टांचे दोन्ही पक्ष वेगवेगळे अस्तीत्व ठेवून एकत्रच वाटचाल करीत आहेत. याचाच वारसा महाराष्ट्रात शिवसेना आणि मनसेने चालविला आहे.
कोणताही वेगळा विचार नाही. केवळ महत्त्वकांक्षा याच कारणातून जे पक्ष निर्माण झाले त्या पक्षांची अवस्था भारतीय राजकारणात पावसाळ्यातील छत्र्यांसारखी झाल्याचे काळाने बघितले आहे. तरी काही पक्ष यांतूनही व्यक्‍तिगत करिष्म्यावर चालले असले तरी ते एकखांबी नेतृत्व असल्याने त्यांच्या वाढीला फारच मर्यादा आहेत. बिहारमधील लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता पक्ष असो, मुलायमसिंग यांचा समाजावादी पक्ष असो वा महाराष्ट्रातील शरद पवार यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्ष असो या पक्षांनी त्या- त्या राज्यात आपले अस्तित्व निर्माण केले असले तरी ते काही टापूपर्यंत निगडीत आहे. त्यामुळेच आज बिहारमध्ये लालूप्रसाद यादव आपल्या ताकदीवर सत्ता मिळवू शकत नाहीत किंवा मुलायमसिंहांनाही उत्तरप्रदेशमध्ये आघाडी करावी लागत आहे. भारतीय राजकारणातील ही वास्तविकता लक्षात घेतल्यास छोट्या पक्षांना टिकण्यासाठी सत्तेची निकड वाटते आणि सत्तेसाठी आघाडीशिवाय पर्याय नाही.
महाराष्ट्राचा विचार केल्यास महाराष्ट्रात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला विरोधक म्हणून भाजप आणि शिवसेना यांची युती आहे. दोन्हीकडे एक ( राष्ट्रवादी कॉंग्रेसची मान्यता राष्ट्रीय पक्ष अशी असली तरी प्रादेशिक पक्षाऐवढीच त्याची ताकद आहे.) राष्ट्रीय आणि एक प्रादेशीक पक्ष आघाडी करुन आहे. पण युतीला कॉंग्रेस आघाडीला सत्तेवरुन दूर घालविण्यासाठी लागणारी ताकद अपुरी पडते आणि ही अपुरी पडणाऱ्या ताकदीची उर्जा सध्या तरी मनसेकडेच आहे.
महाराष्ट्र नवनिर्मान सेना आणि शिवसेना यांच्यात फरक करायचा झाल्यास केवळ दोनच गोष्टींचा फरक करता येतो एक शिवसेनेचे नाव शिवसेना आहे तर मनसेचे नाव मनसे आहे, दुसरे शिवसेना उद्धव ठाकरे चालविता तर मनसे राज ठाकरे यापेक्षा या दोन्ही पक्षांच्या विचारात फरक नाही. शिवसेना हिंदूत्ववादी स्वतःला समजत असली तरी मनसेने स्वतःला धर्मनिरपेक्ष वगैरे काही समजलेले नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांचे विचार ( आणि अविचार सुध्दा) सारखेच आहेत. त्यामुळे केवळ घरातील भाऊबंदकीमुळे निर्माण झालेल्या या शाखा एकत्र न यायला काहीच कारण नाही. छोट्या पक्षांना फार काळ सत्तेबाहेर राहून चालत नाही कारण तसे झाले तर पक्षच चालत नाही त्यामुळे सत्तेची निकड आता दोघांनाही आहे. विशेष करुन शिवसेनेला मुंबईचा गड पाडू द्यायचा नाही तर मनसेला कोणत्याही स्थितीत मुंबंईच्या कुबेराच्या किल्ल्या आपल्या ताब्यात घ्यायच्या आहेत. शिवसेनेला विरोध करत जर मनसेने मुंबई महापालिका निवडणूक लढविली तर मनसेच्या हातात काही बळ लागेल पण या एक भीती अशी आहे की जर शिवसेनेचे बळ कमालीचे घटले आणि कॉंग्रेस राष्ट्रवादीने या भांडणाचा फायदा घेतला तर ज्या सहजतेने राज ठाकरे यांना मुंबई महापालिकेच्या सत्तेत सहभागी होता येणार आहे ती खूप दुरापस्त होईल आणि जरी मनसेच्या पाठिंबा कॉंग्रेस आघाडीने घेतला तरी मनसेला आपला अजेंडा पुढे करण्यात अनेक अडचणी येवू शकतात. परंतु शिवसेना आणि भाजप यांच्याशी युती करुन जर मनसेने मुंबई महापालिकेत प्रवेश केला तर घरातील कार्यकर्ते पोखरने तिला सोपे जाईल. त्यामुळे अंबरनाथ महापालिकेत मनसेने दिलेल्या पाठिंब्याचा मनसेने घोड्याच्या तिरप्या चालीसारखा वापर करायला सुरवात केली आहे.
विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांना अपेक्षित यश जरी मिळाले असले तरी त्यांची भूमिका मात्र त्यांच्यासाठी अनपेक्षीत होती. कॉंग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने मनसेला किंगमेकर होता आले नाही. आता पुढची पाच वर्षे वाट पहाण्याचा संयम राज ठाकरे यांच्याकडे नाही. पक्षासाठी केलेली गुंतवणूक कोणत्याही स्थीतीत व्याजासह बाहेर काढायची असेल तर त्यासाठी त्यांना मुंबईच्या महापालिकेत सत्तेत सहभागी होणं भाग आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत मनसेकडून तरी शिवसेनेच्या पुढाकाराला होकारार्थीच उत्तर मिळेल. राहिला भाग शिवसेनचा तर शिवसेनेला मनसेची मदत घेणं भागच आहे. मनसेमुळे शिवसेना अडचणीत येवू शकते हे सांगायला कोणा राजकीय विश्‍लेषकाची गरज नाही. त्यामुळे जर मनसेने दोन पाऊल पुढे टाकली तर शिवसेना चार पावले पुढे टाकेल यात शंका नाही. त्यामुळे आगामी काळात मनसे शिवसेना युती झाल्यास आश्‍चर्य नको.