मंगळवार, १८ मे, २०१०

मनसे-शिवसेना युती होणारच




महाराष्ट्र नवनिर्मान सेना आणि शिवसेना यांच्यात फरक करायचा झाल्यास केवळ दोनच गोष्टींचा फरक करता येतो एक शिवसेनेचे नाव शिवसेना आहे तर मनसेचे नाव मनसे आहे, दुसरे शिवसेना उद्धव ठाकरे चालवितात तर मनसे राज ठाकरे. यापेक्षा या दोन्ही पक्षांच्या विचारात फरक नाही. शिवसेना हिंदूत्ववादी स्वतःला समजत असली तरी मनसेने स्वतःला धर्मनिरपेक्ष वगैरे काही समजलेले नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांचे विचार ( आणि अविचार सुध्दा) सारखेच आहेत.


प्रवीण कुलकर्णीpravinmila@gmail.com


अंबरनाथच्या नगराध्यक्ष निवडीनंतर संपूर्ण महाराष्ट्रात मनसे आणि शिवसेना एकत्र यावी, अशी चर्चा सुरु झाली. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची चांगला छायाचित्रकार म्हणून केलेली स्तुती आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपले पुस्तक राज यांना भेट म्हणून दिल्याची बातमी यांमुळे दोन्हीकडून एक एक पाऊल पुढे टाकल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यातच आज गोपीनाथ मुंडे यांनी औरंगाबादेत राज-उद्धव एकत्र आल्यास सेना-भाजप युतीची ताकद वाढेल असे विधान केले. साऱ्यांनाच मनसे आणि शिवसेना एकत्र यावी वाटते आहे मग माशी शिंकतेय कुठे.....
भारतात पक्षांची संख्या मोजली तर ती हजाराच्या घरात जाईल पण यांत विचारांत फरक करायचा झाल्यास अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेही विचार समोर येत नाहीत. कॉंग्रेसला कसला विचारच नाही तर भाजप विचारांच्या गर्तेतच सापडला आहे. प्रमुख राष्ट्रीय पक्षांची ही अवस्था आहे तर या दोन्ही पक्ष्यांच्या कळपात सामील होणाऱ्यांचीही तिच दिशा आहे. त्यामुळे दरवर्षी याच पक्षाच्या खोडातून तयार झालेल्या फांद्या कोसळतात, काही काळ तग धरण्याचा प्रयत्नही करतात आणि पुन्हा केव्हा बांडगूळ होऊन त्या झाडावरच अवलंबून राहातात हे कळतच नाही. त्यामुळेच राजकारणात वेगळे प्रवाह तयार झाले नाहीत. जुन्या प्रवाहातूनच अनेक ओढे नाले वाहात राहिले, राहत आहेत. त्यामुळेच कॉंग्रेसमधून फुटलेला राष्ट्रवादी पुन्हा कॉंग्रेसशीच आघाडी करुन सत्तेत सहभागी झाला तर कम्युनिस्टांचे दोन्ही पक्ष वेगवेगळे अस्तीत्व ठेवून एकत्रच वाटचाल करीत आहेत. याचाच वारसा महाराष्ट्रात शिवसेना आणि मनसेने चालविला आहे.
कोणताही वेगळा विचार नाही. केवळ महत्त्वकांक्षा याच कारणातून जे पक्ष निर्माण झाले त्या पक्षांची अवस्था भारतीय राजकारणात पावसाळ्यातील छत्र्यांसारखी झाल्याचे काळाने बघितले आहे. तरी काही पक्ष यांतूनही व्यक्‍तिगत करिष्म्यावर चालले असले तरी ते एकखांबी नेतृत्व असल्याने त्यांच्या वाढीला फारच मर्यादा आहेत. बिहारमधील लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता पक्ष असो, मुलायमसिंग यांचा समाजावादी पक्ष असो वा महाराष्ट्रातील शरद पवार यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्ष असो या पक्षांनी त्या- त्या राज्यात आपले अस्तित्व निर्माण केले असले तरी ते काही टापूपर्यंत निगडीत आहे. त्यामुळेच आज बिहारमध्ये लालूप्रसाद यादव आपल्या ताकदीवर सत्ता मिळवू शकत नाहीत किंवा मुलायमसिंहांनाही उत्तरप्रदेशमध्ये आघाडी करावी लागत आहे. भारतीय राजकारणातील ही वास्तविकता लक्षात घेतल्यास छोट्या पक्षांना टिकण्यासाठी सत्तेची निकड वाटते आणि सत्तेसाठी आघाडीशिवाय पर्याय नाही.
महाराष्ट्राचा विचार केल्यास महाराष्ट्रात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला विरोधक म्हणून भाजप आणि शिवसेना यांची युती आहे. दोन्हीकडे एक ( राष्ट्रवादी कॉंग्रेसची मान्यता राष्ट्रीय पक्ष अशी असली तरी प्रादेशिक पक्षाऐवढीच त्याची ताकद आहे.) राष्ट्रीय आणि एक प्रादेशीक पक्ष आघाडी करुन आहे. पण युतीला कॉंग्रेस आघाडीला सत्तेवरुन दूर घालविण्यासाठी लागणारी ताकद अपुरी पडते आणि ही अपुरी पडणाऱ्या ताकदीची उर्जा सध्या तरी मनसेकडेच आहे.
महाराष्ट्र नवनिर्मान सेना आणि शिवसेना यांच्यात फरक करायचा झाल्यास केवळ दोनच गोष्टींचा फरक करता येतो एक शिवसेनेचे नाव शिवसेना आहे तर मनसेचे नाव मनसे आहे, दुसरे शिवसेना उद्धव ठाकरे चालविता तर मनसे राज ठाकरे यापेक्षा या दोन्ही पक्षांच्या विचारात फरक नाही. शिवसेना हिंदूत्ववादी स्वतःला समजत असली तरी मनसेने स्वतःला धर्मनिरपेक्ष वगैरे काही समजलेले नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांचे विचार ( आणि अविचार सुध्दा) सारखेच आहेत. त्यामुळे केवळ घरातील भाऊबंदकीमुळे निर्माण झालेल्या या शाखा एकत्र न यायला काहीच कारण नाही. छोट्या पक्षांना फार काळ सत्तेबाहेर राहून चालत नाही कारण तसे झाले तर पक्षच चालत नाही त्यामुळे सत्तेची निकड आता दोघांनाही आहे. विशेष करुन शिवसेनेला मुंबईचा गड पाडू द्यायचा नाही तर मनसेला कोणत्याही स्थितीत मुंबंईच्या कुबेराच्या किल्ल्या आपल्या ताब्यात घ्यायच्या आहेत. शिवसेनेला विरोध करत जर मनसेने मुंबई महापालिका निवडणूक लढविली तर मनसेच्या हातात काही बळ लागेल पण या एक भीती अशी आहे की जर शिवसेनेचे बळ कमालीचे घटले आणि कॉंग्रेस राष्ट्रवादीने या भांडणाचा फायदा घेतला तर ज्या सहजतेने राज ठाकरे यांना मुंबई महापालिकेच्या सत्तेत सहभागी होता येणार आहे ती खूप दुरापस्त होईल आणि जरी मनसेच्या पाठिंबा कॉंग्रेस आघाडीने घेतला तरी मनसेला आपला अजेंडा पुढे करण्यात अनेक अडचणी येवू शकतात. परंतु शिवसेना आणि भाजप यांच्याशी युती करुन जर मनसेने मुंबई महापालिकेत प्रवेश केला तर घरातील कार्यकर्ते पोखरने तिला सोपे जाईल. त्यामुळे अंबरनाथ महापालिकेत मनसेने दिलेल्या पाठिंब्याचा मनसेने घोड्याच्या तिरप्या चालीसारखा वापर करायला सुरवात केली आहे.
विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांना अपेक्षित यश जरी मिळाले असले तरी त्यांची भूमिका मात्र त्यांच्यासाठी अनपेक्षीत होती. कॉंग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने मनसेला किंगमेकर होता आले नाही. आता पुढची पाच वर्षे वाट पहाण्याचा संयम राज ठाकरे यांच्याकडे नाही. पक्षासाठी केलेली गुंतवणूक कोणत्याही स्थीतीत व्याजासह बाहेर काढायची असेल तर त्यासाठी त्यांना मुंबईच्या महापालिकेत सत्तेत सहभागी होणं भाग आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत मनसेकडून तरी शिवसेनेच्या पुढाकाराला होकारार्थीच उत्तर मिळेल. राहिला भाग शिवसेनचा तर शिवसेनेला मनसेची मदत घेणं भागच आहे. मनसेमुळे शिवसेना अडचणीत येवू शकते हे सांगायला कोणा राजकीय विश्‍लेषकाची गरज नाही. त्यामुळे जर मनसेने दोन पाऊल पुढे टाकली तर शिवसेना चार पावले पुढे टाकेल यात शंका नाही. त्यामुळे आगामी काळात मनसे शिवसेना युती झाल्यास आश्‍चर्य नको.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा