मंगळवार, २५ सप्टेंबर, २०१२

अजितदादांची अडीच घरे



अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदासह सर्वच मंत्रीपदांचा राजीनामा देऊन महाराष्ट्रातील राजकारणाला वेगळे वळण दिले आहे. त्यांनी उगारलेले राजीनामाअस्त्र म्हणजे जाळ्यात अडकलेल्या पक्ष्यांना हाकारी देण्याचाच प्रकार आहे. यात आता जाळ्यासह सगळे पक्षी उडून जाण्यात यशस्वी होताहेत का? की शिकारी यशस्वी होतो हे काळच ठरवेल. aमात्र, आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत या राजकीय खेळीचे बरे-वाईट परिणाम दिसतील हे मात्र खरे.

............................................
सिंचन प्रकल्पातील घोटाळ्याबाबत होत असलेल्या आरोपांना उत्तर न देता त्यांची निष्पक्षपाती चौकशी व्हावी, म्हणून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदासह आपल्याकडील इतर मंत्रीपदांचा राजीनामा दिला. अजित पवार यांच्या कामाची पद्धत, त्यांची निर्णय घेण्याची पद्धत आणि त्यांचा समाजातील आणि राजकारणातील वावर जर बघितला तर हा निर्णय धक्‍कादायकरित्या आला असला तरी अनपेक्षित नाही. सत्तेला चिकटून राहणारा मी नाही हे त्यांनी राजीनामा दिल्यानंतर सांगितलेला मुद्दा खरा आहे, फक्‍त तो अर्धवट खरा आहे. अजित पवारांसारख्या नेतृत्वाला विभागून सत्ता नको असते, त्यांना पूर्ण सत्ता हवी असते. अजित पवार यांनी त्याचसाठी राजीनामा दिला आहे हे स्पष्ट आहे. पण आगामी विधानसभा निवडणुकीत किती आकडे त्यांच्या बाजूने झुकताहेत यावर त्यांचे हे पूर्ण सत्तेचे स्वप्न अवलंबून आहे.
सिंचन प्रकल्पात घोटाळा झाला का? झालाच असेल तर त्याचा फायदा अजित पवारांनी स्वतःसाठी करुन घेतला की राष्ट्रवादी कॉंग्रेसला करुन दिला की अजित पवारांच्या कामाच्या धडाक्‍याचा इतरांनी लाभ घेतला? या प्रश्‍नांची उत्तरे चौकशीतून पुढे येतीलच पण महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीचा विचार करायचा झाल्यास सध्या तरी अजित पवारांनी बुद्धिबळ पटावरील घोड्याची अडीच घरांची चाल खेळली आहे, यात त्यांना राजाला शहही द्यायचा आहे, आपली प्यादीही वाचवायची आहेत आणि जमल्यास पटावर नवा खेळही मांडायचा आहे. यातील कोणतेही दोन उद्देश यशस्वी झाले तरी तिसरा आपोआप मागून चालून येईल यात शंका नाही.
2004 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा जिंकूनही मुख्यमंत्रीपदापासून दूर व्हावं लागलं होतं, याचं सर्वाधिक शल्य अजित पवार यांना बोचतं. त्यावेळी जर पक्षश्रेष्ठींनी पुढाकार घेतला असता तर मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी कॉंग्रेसलाच मिळाले असते, असे त्यांनी उघडपणे सांगितले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी भूमिका वठविण्यास अजित पवार तयार आहेत, किंवा त्यांची तशी सुप्त इच्छा आहे हे काही गुपीत नाही. अजित पवारांच्या गटातील आमदारांनी केलेल्या "लॉबींग'मुळेच उपमुख्यमंत्रीपदाची माळ पवारांच्या गळ्यात पडली होती, त्यावेळी ज्येष्ठ-श्रेष्ठ असलेल्या छगन भुजबळांनाही डावलल्याची भावना काही लोकांच्या मनात होती, पण त्याकडे दुर्लक्ष करुन राष्ट्रवादीने अजित पवारांचा मार्ग मोकळा केला होता. पण त्यातूनच महाराष्ट्रात राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार आणि अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी हे नवे समीकरण उदयास आले. अजित पवारांची पक्षावरची पकड इतकी घट्‌ट बनली की त्यानंतर त्यांनी आपल्याला हवे असलेले आणि ज्यातून राज्याला काम दिसेल अशी खाती घेतली. ऊर्जा आणि वित्त ही खरे तर दोन स्वतंत्र मंत्र्यांची खाती असताना अजित पवारांनी हट्‌टाने ती आपल्याकडे ठेवली, या पाठिमागे एकच कारण होतं ते म्हणजे राज्य जर भारनियमनमुक्‍त करायचे असेल तर त्यासाठी वेगवेगळे प्रकल्प राबविणे आवश्‍यक होते, त्यासाठी वित्त मंत्रालयातून कोठेही आडकाठी आणली जाऊ नये, याचाच अर्थ असा की आपले काम करताना कोणाची आडकाठी नको ही भूमिका त्यांनी कायम ठेवली आहे. राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला स्वबळावर सत्ता मिळवून देऊन, प्रसंगी काही कमी जागा मिळाल्या तर कॉंग्रेसला बाजूला सारुन शिवसेनेसारख्या पक्षाला बरोबर घेऊन सत्तेपर्यंत अजित पवारांना पोचायचे आहे.
काम करणाऱ्या नेत्याची आपल्याकडे पूर्ण सत्ता असली पाहिजे ही महत्त्वाकांक्षा अयोग्य नाही. ती त्याने बाळगलीच पाहिजे. सिंचन घोटाळ्याच्या फडताळात काहीच सापडणार नाही हे अजितदादांना माहित आहे. पण त्याचा वापर करुन जर कोणी त्यांची बदनामी करत असेल तर त्यांना ती करु न देता फेकलेल्या दगडांचा मैलाचा दगड करण्याची त्यांची नीती आहे.
राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. काही वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्या सुपारी घेतल्यासारख्या त्यांच्या पाठिमागे लागल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीमधील कार्यकर्त्यात भ्रम निर्माण होण्याची शक्‍यता नाकारता येत नव्हती, अशावेळी जोराचा धक्‍का देऊन लोकांच्या कानातील पाखरे उडविण्याची गरज होती, ती आजच्या धक्‍क्‍याने अजित पवारांनी केली आहे.
अजित पवारांना पक्षश्रेष्ठींनी राजीनामा द्या ,असे सांगितलेले नाही तर त्यांनी तो आपणहून दिला आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत पक्ष राहिला आहे. पक्षाच्या मंत्र्यांनी दिलेला राजीनाम्यातून हेच दिसते की अजित पवार एकटे नाहीत. याबरोबरच राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबाबत असलेला रागही यानिमित्ताने व्यक्‍त केला. एकपक्षी कारभार असल्याप्रमाणे पृथ्वीराज चव्हाण यांचे चालले असलेले काम राष्ट्रवादीच्या अनेक मंत्र्यांना मान्य नाही. त्यामुळे त्यांच्याजागी दुसरा नेता असावा अशी त्यांची मागणी आहे. पण कॉंग्रेसच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? हा प्रश्‍न होता. मुख्यमंत्री स्वच्छ प्रतिमेचे असल्याचे मिडीया वारंवार सांगत असल्याने ते कासवगतीचे असल्याचा प्रचार राष्ट्रवादीच्या गोटातून सुरू झाला, पण त्यालाही मुख्यमंत्र्यांनी आकडे फेकत उत्तर दिल्याने त्यांच्या विरोधात मुद्दा राहिला नव्हता. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गटात अस्वस्थता होती. त्याला बाहेर काढण्याचे कामही अजितदादांच्या या खेळीने झाले आहे. त्यांनी राजीनामा देऊन एकप्रकारे आपले पंख पसरले आहेत, म्हणूनच त्यांच्या पंखाखाली जाण्यासाठी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी तातडीने राजीनामे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडे दिले. त्यामुळे या खेळीने राजाला शह देण्याचा एक प्रयत्न तरी बऱ्यापैकी साधला गेलाय हे निश्‍चित, पण शहाबरोबर काटशहही असतो हे अजितदादांनाही माहीत असणार आहे. त्यांनी ही घोड्याची अडीच घरांची चाल खेळली आहे खरे पण आता त्यांना इच्छा असली तरी सरळ खेळी करता येणार नाही, त्यांना आता राजाच्या घरात अडीच घरांची खेळी करतच जायला लागेल. एवढे मात्र खरे महाराष्ट्रात 2014 ची निवडणूक पक्षांपेक्षा नेत्यांत रंगेल आणि त्यात पुढे असतील अजित पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे. कॉंग्रेस नेहमीप्रमाणे दिल्लीकारांवरच अवलंबून असेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा